✍️ अख्तर काझी
दौंड : उस्मान अली शाब्दि उर्दू हायस्कूलच्या मुख्यध्यापिका झरीना जाकीर हुसेन काझी यांना त्यांच्या उत्कृष्ट कार्याबद्दल गुणवंत मुख्याध्यापक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
दौंड तालुका माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा, मुख्याध्यापक संघ, रोटरी क्लब ऑफ दौंड आणि महाराष्ट्र ज्ञानमंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने दौंड तालुक्यातील उपक्रमशील मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी , प्रत्येक शाळेतील इयत्ता दहावी व बारावी परीक्षेमध्ये प्रथम क्रमांक मिळवणारे विद्यार्थी तसेच तालुक्यातील सेवानिवृत्त मुख्याध्यापक यांचा पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला. येथील अष्टविनायक मंगल कार्यालय येथे हा गुणगौरव सोहळा पार पडला.
या कार्यक्रमास पुणे जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष प्रसाद गायकवाड, संपादक रामचंद्र नातू, महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक महामंडळाचे महासचिव आदिनाथ थोरात, रोटरी क्लब ऑफ दौंड च्या अध्यक्षा पायल भंडारी, राज्य राखीव पोलीस दल गट क्र.7 चे पोलीस निरीक्षक पांडुरंग बुरुंगे, रोटरीचे सुनील ढगे, डॉ. संजय इंगळे, हरिभाऊ ठोंबरे, प्रज्ञा राजोपाध्ये, मोहिनी सुरवसे यांच्यासह शिक्षण, सामाजिक व विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
उपस्थित मान्यवरांचे स्वागत पायल भंडारी यांनी केले. प्रास्ताविक अशोक भुजबळ व महेश दरेकर यांनी केले तर सूत्रसंचालन उत्तम जावळे व आभार प्रदर्शन सुरेश वाघमोडे यांनी केले.
गौरव सोहळा यशस्वी करण्यासाठी महाराष्ट्र ज्ञान मंडळाचे उल्हास मिसाळ, नितीन साळवे, शुभांगी मोरे यांनी विशेष परिश्रम घेतले.

✍🏻मुख्य संपादक – संदिप बारटक्के


























