वृत्तवेध मarathi/ संदिप बारटक्के
दौंड : इजिप्त सरकारच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या जगातील सर्वात कठीण मानल्या जाणाऱ्या माराकेज पिरॅमिड मॅरेथॉन २०२५ या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत दौंड येथील मॅरेथॉनपटू डॉ. रोहन खवटे यांनी उल्लेखनीय कामगिरी करत इतिहास घडवला आहे.
डॉ. रोहन खवटे यांनी ही अवघड वाळवंटी मॅरेथॉन अवघ्या २ तास ४७ मिनिटांत पूर्ण करत विक्रम नोंदवला असून त्यांच्या या यशाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.
इजिप्तच्या वाळवंटात पार पडणारी ही मॅरेथॉन जगातील अत्यंत कठीण स्पर्धांपैकी एक मानली जाते. या स्पर्धेचे नियम पाहता ती तीन तासांच्या आत मॅरेथॉन पूर्ण करणे बंधनकारक होते. मात्र, डॉ. रोहन खवटे यांनी ठरलेल्या वेळेपेक्षा कमी वेळेत स्पर्धा पूर्ण करत आपली शारीरिक क्षमता आणि जिद्द सिद्ध केली.
या आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धेत भारतासह तब्बल १२० देशांतील सुमारे १० हजार स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. एवढ्या मोठ्या स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करत डॉ. रोहन खवटे हे ही स्पर्धा पूर्ण करणारे महाराष्ट्रातील दुसरे, तर पुणे जिल्ह्यातील पहिले धावपटू ठरले आहेत.
या यशाबद्दल पुणे युनिव्हर्सिटी रनर असोसिएशन यांच्या वतीने मान्यवरांच्या हस्ते डॉ. रोहन खवटे यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
आजपर्यंत डॉ. रोहन खवटे यांनी देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय अशा २३० हून अधिक मॅरेथॉन स्पर्धांमध्ये सहभाग घेतला असून स्वतःसह दौंड शहराचे नाव जागतिक पातळीवर उज्वल केले आहे. दिल्ली, गुजरात, मुंबई, पुणे, सांगली आणि सातारा मॅरेथॉनचे ते ब्रँड अँबेसॅडर म्हणूनही कार्यरत राहिले आहेत.
आपल्या यशाबाबत बोलताना डॉ. रोहन खवटे म्हणाले,
“शालेय जीवनापासूनच मला धावण्याची विशेष आवड होती. शाळेत असताना विविध धावण्याच्या स्पर्धांमध्ये मला पारितोषिके मिळाली. नित्यनियमाने धावण्याची सवय ठेवल्यामुळे मॅरेथॉनसारख्या स्पर्धांसाठी शारीरिक आणि मानसिक तयारी कायम राहते. धावणे हा दैनंदिन जीवनातील एक उत्तम व्यायाम असून त्यामुळे शरीर सदैव निरोगी राहते.”
डॉ. रोहन खवटे यांच्या या उल्लेखनीय यशामुळे दौंड शहरासह पुणे जिल्ह्याच्या क्रीडा क्षेत्रात अभिमानाची भर पडली आहे.

✍🏻मुख्य संपादक – संदिप बारटक्के






















