वृत्तवेध मarathi / संदिप बारटक्के
दौंड : दौंड नगरपालिका हद्दीतील विविध प्रभागांमध्ये विद्युत पोल देखभाल, दुरुस्ती तसेच मटेरियल पुरवठा करून स्ट्रीट लाईट पोल बसविण्याच्या कामासाठी दिनांक २३ जानेवारी २०२६ रोजी नगरपालिका व संबंधित कंपनी यांच्यात करारनामा करण्यात आला आहे.
त्यानंतर दि. २५ फेब्रुवारी २०२६ रोजी जावक क्रमांक दौंनपा/विद्युत/४१५/२०२६ अन्वये संबंधित कंपनीस पूरक आदेशही देण्यात आला होता. मात्र, या कामाच्या अंमलबजावणीत मोठ्या प्रमाणात दिरंगाई होत असल्याचा आरोप नगरसेविका स्वाती निलेश सावंत यांनी केला आहे. आपल्या प्रभाग क्रमांक सहा मध्ये स्ट्रीट लाईट पोल बसविणे, दुरुस्ती व आवश्यक साहित्य पुरवठा करण्यासाठी वारंवार मागणी करूनही नगरपालिका प्रशासन व संबंधित ठेकेदार याकडे दुर्लक्ष करत असल्याचे त्यांनी सांगितले.
नगरसेविका स्वाती निलेश सावंत यांनी पुढे म्हटले की, करारनाम्यानुसार काम पूर्ण करणे अपेक्षित असताना संबंधित ठेकेदारांकडून केवळ उडवाउडवीची उत्तरे दिली जात आहेत. यामुळे नागरिकांना अंधाराचा सामना करावा लागत असून नगरपालिकेच्या प्रतिमेलाही धक्का बसत आहे. त्यामुळे संबंधित ठेकेदारावर तात्काळ कारवाई करून पुरवठा करार रद्द करण्यात यावा, अशी मागणी त्यांनी मुख्याधिकारी अवधूत तावडे व नगराध्यक्षा दुर्गादेवी जगदाळे-पाटील यांच्याकडे केली आहे.
दरम्यान, बी.ए.सी. इन्फ्राटेक प्रा. लि. व विंन्सी ग्लोबल प्रा. लि. (जे.व्ही.) या कंपनीने आतापर्यंत दौंड शहरातील नेमक्या कोणत्या प्रभागांमध्ये एलईडी दिवे पुरवले, किती ठिकाणी सिमेंट पोल व लोखंडी क्लॅम्प बसविले, ३ इंची पाईप किती ठिकाणी बसविण्यात आले, तसेच ६ एमएम सर्व्हिस वायर किती प्रमाणात टाकण्यात आली याची सविस्तर माहिती देण्यात यावी, अशी मागणीही सावंत यांनी केली आहे.
यासोबतच संबंधित कामांचे जीओ-टॅग फोटो व तपशीलासह अहवाल सादर करण्याची मागणी करण्यात आली असून, प्रत्यक्षात किती काम झाले याबाबत पारदर्शकता ठेवावी, असेही त्यांनी स्पष्ट केले.
या प्रकरणामुळे दौंड शहरातील स्ट्रीट लाईट कामांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाला असून, नगरपालिका प्रशासन यावर काय भूमिका घेते याकडे दौंड शहरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.

✍🏻मुख्य संपादक – संदिप बारटक्के


























