✍️ संदिप बारटक्के
दौंड : प्रखर हिंदुत्ववादी भूमिका आणि विविध सामाजिक विषयांवर आक्रमक वक्तव्यांमुळे सतत चर्चेत असलेले अहिल्यानगर शहर मतदारसंघाचे आमदार संग्राम जगताप यांची दौंड नगरपरिषदेचे राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते जीवराज बापू पवार आणि दौंड तालुका खादी ग्रामोद्योग संघांचे माजी अध्यक्ष निलेश सावंत यांनी अहिल्यानगर येथे भेट घेतली. या भेटीचे फोटो सोशल मीडियाच्या माध्यमातून समोर आल्यानंतर दौंडच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
जीवराज बापू पवार आणि निलेश सावंत हे दौंडमधील सक्रिय राजकीय व सामाजिक क्षेत्रातील व्यक्ती म्हणून परिचित आहेत. निलेश सावंत हे नवनिर्वाचित नगरसेविका स्वाती सावंत यांचे पती आहेत. त्यामुळे दोघांनी एकत्रितपणे आमदार संग्राम जगताप यांची भेट घेतल्याने या भेटीमागे नेमका कोणता विषय होता, याबाबत राजकीय वर्तुळात उत्सुकता निर्माण झाली आहे.
आमदार संग्राम जगताप हे हिंदू समाजाशी संबंधित कार्यक्रमांमध्ये आपल्या भूमिकेमुळे चर्चेत राहिले आहेत. त्यामुळे दौंडमध्ये हिंदू समाजाशी संबंधित एखादा सामाजिक अथवा धार्मिक उपक्रम, आगामी कार्यक्रम किंवा संघटनात्मक विषयावर या भेटीदरम्यान चर्चा झाली का, याबाबतही तर्क-वितर्क सुरू झाले आहेत.
विशेष म्हणजे, दौंडमधील राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची अहिल्यानगर येथे आमदार संग्राम जगताप यांच्यासोबत झालेली ही भेट स्थानिक राजकीय वर्तुळासाठी लक्षवेधी ठरली आहे. मात्र, भेटीचा नेमका उद्देश किंवा चर्चेचा विषय याबाबत संबंधितांकडून अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
भेटीमागे नेमके कारण काय?
जीवराज पवार आणि निलेश सावंत यांनी आमदार संग्राम जगताप यांची घेतलेली भेट ही केवळ सदिच्छा भेट होती, की दौंडमध्ये आगामी काळात होणाऱ्या एखाद्या सामाजिक, धार्मिक किंवा संघटनात्मक उपक्रमाची पूर्वतयारी होती, याबाबत सध्या स्पष्टता नाही. त्यामुळे या भेटीत नेमकी चर्चा कोणत्या विषयावर झाली? आगामी काळात या भेटीचे काही राजकीय अथवा सामाजिक पडसाद उमटणार का? याकडे दौंडच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
भेटीमागील नेमके कारण संबंधितांच्या अधिकृत भूमिकेनंतरच स्पष्ट होणार असून, तोपर्यंत या भेटीने दौंडच्या राजकीय चर्चेला मात्र चांगलेच उधाण आले आहे.

✍🏻मुख्य संपादक – संदिप बारटक्के






















