✍️ संदिप बारटक्के
दौंड : दौंड नगर परिषदेतील सफाई कर्मचाऱ्यांच्या विविध अडचणी, समस्या आणि कामकाजाशी संबंधित विषय जाणून घेण्यासाठी नगराध्यक्षा दुर्गादेवी इंद्रजित जगदाळे-पाटील यांनी सफाई कर्मचाऱ्यांसोबत प्रत्यक्ष बसून सविस्तर चर्चा केली. कर्मचाऱ्यांच्या विविध प्रश्नांवर सकारात्मक चर्चा झाल्याने ही बैठक समाधानकारक वातावरणात पार पडली.
यावेळी सफाई कर्मचाऱ्यांची इन्शुरन्स पॉलिसी, पॉलिसी उपलब्ध करून देण्यासंदर्भातील कार्यवाही, कामाची दिशा व विभागणी, कामाच्या वेळेचे नियोजन तसेच कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानाचा प्रश्न यांसह विविध महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करण्यात आली. कर्मचाऱ्यांच्या अडचणी समजून घेत त्यातून योग्य मार्ग कसा काढता येईल, याबाबतही सकारात्मक चर्चा करण्यात आली.
विशेष म्हणजे, कर्मचाऱ्यांच्या समस्या केवळ कार्यालयीन पातळीवर न ऐकता नगराध्यक्षा दुर्गादेवी जगदाळे यांनी स्वतः कर्मचाऱ्यांसोबत बसून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. त्यांच्या प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी नगराध्यक्षांनी स्वतः पुढाकार घेतल्याने कर्मचाऱ्यांनी समाधान व्यक्त केले.
यावेळी सफाई कर्मचाऱ्यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की, आमच्या अडचणी काय आहेत, त्या समजून घेण्यासाठी आणि त्यातून मार्ग काढण्यासाठी नगराध्यक्षांनी स्वतः आमच्यासोबत बसून चर्चा केली. सफाई कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांसाठी अशा पद्धतीने प्रत्यक्ष संवाद साधणाऱ्या दौंडमधील पहिल्या नगराध्यक्षा आपणच आहात. आजपर्यंत आम्ही असे नगराध्यक्ष पाहिले नाहीत,अशा भावना कर्मचाऱ्यांनी व्यक्त केल्या.
कर्मचाऱ्यांनी नगराध्यक्षा कु. दुर्गादेवी इंद्रजित जगदाळे -पाटील यांचे अभिनंदन करत त्यांच्या पुढाकाराबद्दल समाधान व्यक्त केले.
शहराच्या स्वच्छतेची महत्त्वाची जबाबदारी पार पाडणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांच्या अडचणी समजून घेऊन त्यांच्याशी थेट संवाद साधणे, त्यांच्या प्रश्नांवर सकारात्मक चर्चा करणे आणि त्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न करणे, या दृष्टीने ही बैठक महत्त्वपूर्ण ठरली.
कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांवर संवाद, समन्वय आणि सकारात्मक दृष्टिकोनातून पुढील कार्यवाही करण्याचा प्रयत्न केला जाणार असून, त्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी आवश्यक त्या पातळीवर पाठपुरावा करण्यात येईल, अशी भूमिका यावेळी व्यक्त करण्यात आली.

✍🏻मुख्य संपादक – संदिप बारटक्के






















