✍️ अख्तर काझी
दौंड: शहरातील हिंद टॉकीज परिसर ते नगरमोरी रस्त्यावरील नगरपालिकेचे अर्धवट बांधकाम झालेले शौचालय कोणीतरी पाडण्याचा प्रयत्न केला आहे की काय? असे चित्र पाहायला मिळत आहे. अर्धवट अवस्थेतील या शौचालयाची अशी दुर्दशा झालेली दिसत असताना नगरपालिकेला मात्र याबाबत काही माहिती आहे की नाही? असा प्रश्न आता नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. याचे कारण म्हणजे या घटनेची नगरपालिका प्रशासनाकडून अद्याप कोणाकडेही चौकशी करण्यात आलेली नसून कोठे तक्रारही करण्यात आलेली नाही तसेच या परिसरातील स्थानिकांकडेही साधी विचारपूस सुद्धा करण्यात आलेली नाही अशी माहिती समोर येत आहे. या आधीही नगरपालिकेच्या भाजी मंडई परिसरातील एक शौचालय एका रात्रीत जमीनदोस्त करण्यात आले होते. या घटनेची सुद्धा नगरपालिका प्रशासनाने अद्याप चौकशी अथवा तक्रार केलेली नाही. असे अजब किस्से सध्या शहरात होताना दिसत आहेत त्यामुळे सध्या नगरपालिकेत चाललंय तरी काय? असा प्रश्न दौंडकर उपस्थित करीत आहेत.
शहरातील नगरपालिकेची बहुतांशी शौचालये कोणत्या ना कोणत्या कारणाने पाडण्यात आलेली आहेत. शहरातील प्रमुख चौकांमध्ये, बाजारपेठेत सध्या एकही सार्वजनिक शौचालय नाही अशी परिस्थिती आहे. असे असताना शहरात नवीन शौचालय न घेता शहराबाहेर जाणाऱ्या एकाच रस्त्यावर तीन शौचालय बांधण्याचा अजब व वादग्रस्त निर्णय नगरपालिकेने घेतला आहे. त्याप्रमाणे ठेकेदाराला कामही देण्यात आले, परंतु आता ते बांधकाम अर्धवट अवस्थेत थांबविण्यात आले असल्याचे चित्र आहे. आणि याच अर्धवट अवस्थेतील तीन शौचालयापैकी एक शौचालय पाडण्याचा प्रयत्न झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या शौचालयाच्या बांधकामाला अज्ञात वाहनाची धडक बसली आहे का?की जाणून बुजून कोणीतरी ते पाडण्याचा प्रयत्न करतो आहे याचा तपास नगरपालिकेने करणे गरजेचे आहे असे बोलले जात आहे. हा विषय नगरपालिकेतील बांधकाम विभागाशी निगडित असल्याने बांधकाम विभागाचे प्रमुख बनसोडे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी फोन उचलण्याची सुद्धा तसदी घेतलेली नाही. नगरपालिकेत जाऊन चौकशी केली असता बनसोडे आज आलेले नाहीत असे उत्तर देण्यात आले.

✍🏻मुख्य संपादक – संदिप बारटक्के






















