वृत्तवेध मarathi / संदिप बारटक्के
दौंड | पत्रकारांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्याच्या आरोपावरून खासदार संजय दिना पाटील यांच्याविरोधात तात्काळ गुन्हा दाखल करून कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी ठाम मागणी भारतीय पत्रकार संघ, दौंड शहर व तालुक्याच्या वतीने करण्यात आली आहे. याबाबतचे निवेदन दौंड शहर पोलीस स्टेशनचे प्रभारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांना देण्यात आले.
पोलिसांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ असून सत्य घटना जनतेपर्यंत पोहोचविण्याची अत्यंत महत्त्वाची जबाबदारी तो पार पाडतो. अशा परिस्थितीत एका लोकप्रतिनिधीकडून पत्रकारांना सार्वजनिक ठिकाणी अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करणे, जीवे मारण्याची धमकी देणे आणि पत्रकारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण करणारे वक्तव्य करणे, हे अत्यंत गंभीर आणि निषेधार्ह आहे.
भारतीय पत्रकार संघाने या घटनेला केवळ पत्रकारांचा नव्हे तर अभिव्यक्ती स्वातंत्र्य, स्वतंत्र पत्रकारिता आणि भारतीय संविधानाने दिलेल्या मूलभूत अधिकारांवरील थेट आघात असल्याचे म्हटले आहे. अशा प्रकारच्या घटनांकडे दुर्लक्ष झाल्यास समाजात चुकीचा संदेश जाईल आणि पत्रकारांच्या सुरक्षिततेवर गंभीर परिणाम होऊ शकतो, अशी चिंता देखील निवेदनातून व्यक्त करण्यात आली.
संघटनेने संबंधित प्रकरणाची तात्काळ चौकशी करून पत्रकार सुरक्षा कायद्यांनुसार तसेच लागू असलेल्या कायदेशीर तरतुदींनुसार खासदार संजय दिना पाटील यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसेच या निवेदनाची अधिकृत नोंद घेऊन करण्यात आलेल्या कार्यवाहीची माहिती लेखी स्वरूपात देण्याची मागणीही करण्यात आली.
यावेळी भारतीय पत्रकार संघाचे दौंड तालुका अध्यक्ष सुभाष कदम, राजेश बोर्डे, सदाशिव रणदिवे, पांडुरंग गडेकर, अमर जोगदंड, दिनेश पवार, प्रकाश सोनवणे, संदिप बारटक्के, विजय जाधव, रवींद्र देसाई, मयूर कांबळे, सुदाम फासगे आदी पदाधिकारी व पत्रकार उपस्थित होते.

✍🏻मुख्य संपादक – संदिप बारटक्के


























