✍️ संदिप बारटक्के
दौंड : आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांची जयंती ७ सप्टेंबर २०२६ रोजी दौंड नगरपरिषद कार्यालयात शासकीय पद्धतीने साजरी करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. याबाबत दौंड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अवधूत तावडे यांना निवेदन देण्यात आले.
अक्षय राजू गावडे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, आद्यक्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांची जयंती ७ सप्टेंबर रोजी आहे. महाराष्ट्र शासनाच्या वतीने उमाजी नाईक यांची जयंती साजरी करण्याबाबत शासन निर्णय (जीआर) जारी करण्यात आलेला आहे. या शासन निर्णयाची दखल घेऊन दौंड नगरपरिषद कार्यालयात ७ सप्टेंबर रोजी उमाजी नाईक यांची जयंती शासकीय पद्धतीने साजरी करावी.
आद्यक्रांतिवीर उमाजी नाईक यांनी ब्रिटिश सत्तेविरोधात संघर्ष करत स्वातंत्र्याच्या लढ्याला बळ दिले. त्यांच्या शौर्य, त्याग आणि क्रांतिकारी कार्याचे स्मरण व्हावे तसेच त्यांच्या विचारांचा आणि कार्याचा नव्या पिढीला परिचय व्हावा, यासाठी नगरपरिषद स्तरावर जयंती कार्यक्रम आयोजित करणे आवश्यक असल्याचे निवेदनात म्हटले आहे.
यावेळी अक्षय अंकुश, दीपक कांबळे, अक्षय गावडे, नितीन भांडवलकर तसेच नगरसेवक मुकेश जगताप उपस्थित होते. त्यांनी मुख्याधिकारी अवधूत तावडे यांच्याकडे निवेदन सादर करून ७ सप्टेंबर रोजी नगरपरिषद कार्यालयात उमाजी नाईक यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून जयंती कार्यक्रम आयोजित करण्याची मागणी केली.

✍🏻मुख्य संपादक – संदिप बारटक्के






















