✍️ संदिप बारटक्के
दौंड : दौंड शहरातील प्रभाग क्रमांक चारमध्ये मोकाट व आक्रमक कुत्र्यांचा उपद्रव मोठ्या प्रमाणात वाढला असून, या कुत्र्यांमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मोकाट कुत्री नागरिकांच्या अंगावर धावून जात असल्याने लहान मुले, महिला, ज्येष्ठ नागरिक तसेच पादचाऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला आहे. या समस्येची तातडीने दखल घेऊन मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी दौंड मर्चंट असोसिएशनचे अध्यक्ष राजेश सदानंद पाटील यांनी दौंड नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.
दौंड पोलीस स्टेशनच्या मागील बाजूस, प्रभाग क्रमांक चारमधील हरी ओम कलर लॅबसमोरील परिसरात मोकाट कुत्र्यांचा त्रास वाढल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. या परिसरातून दररोज नागरिकांची मोठ्या प्रमाणावर ये-जा सुरू असते. पुणे ते दौंड मार्गावर प्रवास करणाऱ्या नागरिकांचीही या परिसरात वर्दळ असते. अशा परिस्थितीत आक्रमक कुत्री अचानक नागरिकांच्या अंगावर धावून जात असल्याने नागरिकांना जीव मुठीत धरून मार्गक्रमण करावे लागत असल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.
तसेच परिसरातील लहान मुले घराबाहेर खेळत असताना किंवा शाळेत ये-जा करताना त्यांच्यावर कुत्र्यांकडून हल्ला होण्याची शक्यता नाकारता येत नाही. ज्येष्ठ नागरिक आणि पायी चालणाऱ्या नागरिकांनाही या कुत्र्यांमुळे धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे एखादी गंभीर दुर्घटना घडण्यापूर्वीच नगरपरिषदेने या समस्येवर ठोस उपाययोजना करणे आवश्यक आहे.
दौंड शहरातील सर्वच प्रभागात मोकाट कुत्र्यांचा उपद्रव वाढला आहे. मोकाट कुत्र्यांचा प्रश्न केवळ नागरिकांच्या गैरसोयीपुरता मर्यादित नसून तो सार्वजनिक सुरक्षिततेशी संबंधित आहे. कुत्र्यांच्या वाढत्या उपद्रवामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होत असल्याने संबंधित यंत्रणेने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी वेळेत कार्यवाही करणे महत्त्वाचे असल्याचे निवेदनात अधोरेखित करण्यात आले आहे.
या पार्श्वभूमीवर दौंड नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांनी संबंधित विभागाला तातडीने सूचना देऊन परिसरातील मोकाट व आक्रमक कुत्र्यांचा प्रश्न मार्गी लावावा. तसेच कुत्र्यांना नियमानुसार आणि सुरक्षित पद्धतीने पकडून त्यांच्याबाबत प्रचलित नियमांनुसार योग्य ती कार्यवाही करावी, अशी मागणी राजेश पाटील यांनी केली आहे.
प्रभाग क्रमांक चारमधील नागरिकांच्या सुरक्षिततेचा विचार करून या तक्रारीची तातडीने दखल घेणे आवश्यक आहे. विशेषतः लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत नगरपरिषद प्रशासनाने संबंधित परिसराची पाहणी करून आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

✍🏻मुख्य संपादक – संदिप बारटक्के






















