✍️ संदिप बारटक्के
दौंड पोलीस स्टेशनमध्ये दाखल असलेल्या बनावट नोटा प्रकरणी (गुन्हा र. नं. 499/2026) तपासात महत्त्वाची प्रगती झाली असून भारतीय न्याय संहिता कलम 179 अंतर्गत दाखल गुन्ह्यात पाच आरोपींना अटक करण्यात आली आहे. तपासादरम्यान या पाचही आरोपींनी संगनमताने गुन्हा केल्याचे निष्पन्न झाल्यानंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले.
अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये हितेश चिदानंद चलवादी (रा. पासलकरवस्ती, दौंड), प्रेम संजय मंजुळे (सध्या मोशी, मुळ रा. दौंड), विनोद विष्णू मुंडे (सध्या पुणे, मुळ रा. परळी वैजनाथ, बीड), रणजीत भास्करराव डिग्रज (सध्या भोसरी, मुळ रा. अकोला, अमरावती) आणि ओमकार सतीष मोरे (रा. देवगाव, ता. केज, जि. बीड) यांचा समावेश आहे.
अटक केलेल्या आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्यांना ७ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
पोलीस आता आरोपींच्या राहत्या ठिकाणी घरझडती घेणार असून या प्रकरणात आणखी पुरावे, बनावट नोटांचे साहित्य किंवा इतर आरोपींचा सहभाग आहे का, याचा सखोल तपास सुरू आहे.
दौंड पोलीस स्टेशनकडून या बनावट नोटा प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून, या रॅकेटशी संबंधित आणखी धागेदोरे समोर येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

✍🏻मुख्य संपादक – संदिप बारटक्के


























