वृत्तवेध मarathi / संदिप बारटक्के
दौंड — स्वराज्य रक्षक, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या अतुलनीय शौर्याला, अढळ ध्येयनिष्ठेला आणि सर्वोच्च बलिदानाला कोटी कोटी वंदन करण्यासाठी शिवप्रतिष्ठान हिंदुस्तान दौंड यांच्या वतीने दौंड शहरामध्ये संपूर्ण फाल्गुन महिना “धर्मवीर बलिदान मास” म्हणून पाळण्यात येत आहे.
धर्मासाठी आणि स्वराज्यासाठी देहाची तमा न बाळगता मृत्यूलाही जिंकणाऱ्या शंभूराजांच्या स्मृतीस आदरांजली वाहण्यासाठी हिंदू बांधवांकडून फाल्गुन शुद्ध प्रतिपदा ते फाल्गुन अमावस्या हा संपूर्ण महिना बलिदान मास म्हणून पाळण्यात येतो. धर्मवीर बलिदान मासानिमित्त दौंड येथील धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चौकामध्ये दररोज शंभुराजांना श्रद्धांजली वाहिली जाते.हा कार्यक्रम महिनाभर आयोजित करण्यात येत असून शंभूराजांच्या कार्याचे स्मरण केले जात आहे.
बलिदान मासानिमित्त दौंड मधील विविध शाळांमधील विद्यार्थ्यांकडून दररोज धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांना अभिवादन करण्यात येत आहे. आजच्या कार्यक्रमात दौंड नगराध्यक्षा दुर्गादेवी जगदाळे-पाटील तसेच नगरसेविका स्वाती निलेश सावंत यांनी उपस्थित राहून धर्मवीरांना आदरांजली वाहिली.
१८ फेब्रुवारी ते १८ मार्च दरम्यान पाळण्यात येणाऱ्या या बलिदान मासात शहरातील अनेक शाळांनी सहभाग दिसून येत आहे. यात ब्लॉसम स्कूल, संस्कार शाळा, जिजामाता विद्यालय (गोपाळवाडी), गॅरेला विद्यालय, शिशु विकास मंदिर, श्रीमती विठाबाई चव्हाण कन्या विद्यालय,वरवंड शाळा, शेठ ज्योती प्रसाद विद्यालय तसेच श्री मंगेश मेमोरियल स्कूल व लर्न अँड प्ले स्कूल या शाळांचा समावेश आहे.
यावेळी दत्ताजी शिणोलीकर यांच्यासह अनेक शिवभक्त उपस्थित होते.

✍🏻मुख्य संपादक – संदिप बारटक्के






















