वृत्तवेध मarathi / संदिप बारटक्के
दौंड शहरातील प्रमुख रस्त्यांवरील रोडलाईट मागील दहा ते पंधरा दिवसांपासून बंद असल्यामुळे नागरिकांकडून तीव्र नाराजी व्यक्त केली जात असून रात्रीच्या वेळी नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. दौंड नगरपरिषद हद्दीतील तसेच सार्वजनिक बांधकाम विभाग (PWD) आणि महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (MSRDC) यांच्या अखत्यारीतील काही महत्त्वाच्या मार्गांवर अंधाराचे साम्राज्य पसरले असून यामुळे अपघात व गुन्हेगारीच्या घटनांची भीती व्यक्त होत आहे.
नागरिकांच्या म्हणण्यानुसार सोनवडी ते नगर मोरी चौक, नगर मोरी चौक ते उड्डाणपूल, उड्डाणपूल ते गोल राऊंड तसेच गोल राऊंड ते एसआरपीएफ (ग्रुप क्र. 5) मुख्य प्रवेशद्वार या प्रमुख मार्गांवरील अनेक रोडलाईट बंद अवस्थेत आहेत. या रस्त्यांवर दररोज हजारो वाहनांची ये-जा होत असून रात्री उशिरापर्यंत नागरिकांची वर्दळ असते. मात्र, गेल्या अनेक दिवसांपासून रोडलाईट बंद असल्यामुळे वाहनचालक, पादचारी, महिला, ज्येष्ठ नागरिक तसेच विद्यार्थ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
विशेषतः उड्डाणपूल परिसर, गोल राऊंड परिसर आणि एसआरपीएफ मुख्य प्रवेशद्वाराकडे जाणाऱ्या मार्गावर रात्री प्रचंड अंधार पडत असल्याने किरकोळ अपघातांची शक्यता वाढली असून चोरी, लूटमार किंवा इतर अनुचित प्रकार घडण्याची भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे. अनेक नागरिकांनी संबंधित विभागांकडे तोंडी व लेखी स्वरूपात तक्रारी केल्याचे सांगितले जात असले तरी अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नसल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे.
नागरिकांनी सार्वजनिक बांधकाम विभाग, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ तसेच दौंड नगरपरिषद प्रशासनाने तातडीने प्रत्यक्ष पाहणी करून बंद असलेले सर्व रोडलाईट सुरू करावेत, अशी मागणी केली आहे. तसेच या गंभीर समस्येकडे दुर्लक्ष झाल्यामुळे भविष्यात कोणतीही दुर्घटना किंवा अनुचित घटना घडल्यास त्याची जबाबदारी संबंधित यंत्रणांवर निश्चित करण्यात यावी, अशीही मागणी पुढे येत आहे.
याबाबत सामाजिक कार्यकर्ते अमर मधुकर जोगदंड यांनी संबंधित प्रशासनाचे लक्ष वेधत नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने तात्काळ कार्यवाही करण्याची मागणी केली आहे. प्रशासनाने लवकरात लवकर दखल घेऊन रोडलाईट सुरू करावेत, अन्यथा नागरिकांच्या सहभागातून लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला आहे.
दौंड शहराच्या वाढत्या शहरीकरणाच्या पार्श्वभूमीवर रस्त्यांवरील प्रकाश व्यवस्था ही केवळ सुविधा नसून नागरिकांच्या सुरक्षेशी निगडित अत्यावश्यक बाब आहे. त्यामुळे संबंधित विभागांनी समन्वय साधून ही समस्या तातडीने सोडवावी, अशी अपेक्षा सर्व स्तरांतून व्यक्त होत आहे.

✍🏻मुख्य संपादक – संदिप बारटक्के






















