वृत्तवेध मarathi | संदिप बारटक्के
दौंड : भारतीय स्वातंत्र्यलढ्याचे महानायक, क्रांतीकारक, प्रखर राष्ट्रवादी विचारवंत आणि थोर देशभक्त स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या ६० व्या आत्मार्पण दिनानिमित्त दौंड शहरात त्यांना भावपूर्ण आदरांजली वाहण्यात आली. दौंड शहरातील सावरकर स्मारक परिसर राष्ट्रभक्तीच्या घोषणांनी दुमदुमून गेला होता.
स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकाचे नूतनीकरण आणि विकास दौंड नगरपरिषद व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या संयुक्त पुढाकारातून, दौंडचे आमदार ॲड. राहुल कुल यांच्या विशेष विकास निधीतून शहरातील ‘सावरकर स्मारका’चे नुकतेच सुशोभीकरण व नूतनीकरण करण्यात आले आहे. नव्या रूपात साकारलेले हे स्मारक अधिक आकर्षक, देखणे आणि प्रेरणादायी ठरले असून लवकरच याचे भव्य उद्घाटन समारंभपूर्वक पार पडणार आहे.
दौंड नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा दुर्गादेवी जगदाळे-पाटील यांच्या हस्ते स्मारकास पुष्पचक्र अर्पण करून सावरकरांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन करण्यात आले.
“सावरकरांचे राष्ट्रनिष्ठ, विज्ञाननिष्ठ आणि पराक्रमी विचार नव्या पिढीला सतत प्रेरणा देत राहतील,” अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
या कृतज्ञता सोहळ्यास नगरसेवक इंद्रजित जगदाळे, योगेश कटारिया, रोहित पाटील, निलेश पवार, प्रशांत खादगे, अथर्व सरनोत, रुपेश कटारिया, हरिभाऊ ठोंबरे, रितेश ओझा, दत्ताजी शेनोलीकर आणि रामेश्वर मंत्री यांच्यासह शहरातील बहुसंख्य सावरकरप्रेमी नागरिक व स्वातंत्र्यप्रेमी उपस्थित होते.
उपस्थितांनी सावरकरांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्यांच्या त्याग आणि बलिदानाचे स्मरण केले.
कार्यक्रमाचा समारोप सामूहिक ‘वंदे मातरम्’ने करण्यात आले.

✍🏻मुख्य संपादक – संदिप बारटक्के






















