✍️ संदिप बारटक्के
दौंड : दौंड शहरातील नगरमोरी चौक ते भीमनगर या मुख्य रस्त्यावरून होणारी अवजड वाहनांची वाहतूक नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी धोकादायक ठरत असल्याचा मुद्दा उपस्थित करत, ही वाहतूक दौंड शहराबाहेरील मार्गाने वळवण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या उद्योग विभागाचे शहराध्यक्ष गौरव राजेंद्र सरनोत यांनी दौंड पोलीस स्टेशनकडे निवेदनाद्वारे केली आहे. यावेळी शहरातील व्यापारी उपस्थित होते.
दौंड शहरातील नगरमोरी चौक ते भीमनगर हा प्रमुख रहदारीचा मार्ग असून, या रस्त्यावर शहरातील मुख्य बाजारपेठ, शाळा, रुग्णालये आणि विविध छोटे – मोठे व्यापाऱ्यांचे दुकाने आहेत. रस्त्याच्या दुतर्फा चार माध्यमिक शाळा आणि तीन रुग्णालये असल्याने या परिसरात दिवसभर नागरिकांची मोठी वर्दळ असते. विद्यार्थी, लहान मुले, ज्येष्ठ नागरिक, रुग्ण तसेच व्यापारी आणि ग्राहकांची या रस्त्यावर सतत ये-जा सुरू असते.
अशा वर्दळीच्या रस्त्यावरून कंटेनर, जड मालवाहू ट्रक, व्होल्वो बस, उसाचे ट्रॅक्टर, डंपर आणि इतर अवजड वाहने मोठ्या प्रमाणावर ये-जा करत असल्याचे निवेदनात म्हटले आहे. काही वाहने वेगाने जात असल्याने अपघाताचा धोका वाढत असून, वाहतूक कोंडीमुळे नागरिकांना आणि व्यापाऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत असल्याचेही सांगण्यात आले.
तसेच छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरात अपघातांच्या वारंवार घटना घडत असल्याने दौंडकरांकडून चिंता व्यक्त केली जात आहे. शहरातील अंतर्गत रस्त्यांवरून मुख्य मार्गावर येणारी वाहने आणि अवजड वाहतुकीमुळे रस्त्यावरून पायी चालणेही दौंडकरांना कठीण होत असल्याची परिस्थिती आहे. यातून वाहनचालकांमध्ये वादाचे प्रसंग निर्माण होतात. या परिस्थितीचा स्थानिक व्यापाऱ्यांच्या व्यवसायावरही परिणाम होत असल्याचे निवेदनात म्हटले आहे.
दौंड शहरातील वाढती वर्दळ आणि अवजड वाहनांमुळे निर्माण होणारा अपघाताचा धोका लक्षात घेता, नगरमोरी चौक ते भीमनगर या मुख्य रस्त्यावरून जाणारी अवजड वाहने शहराबाहेरील पर्यायी मार्गाने वळवावीत, अशी मागणी गौरव सरनोत यांनी केली आहे. संबंधित प्रशासनाने या प्रश्नाची गांभीर्याने दखल घेऊन वाहतुकीचे योग्य नियोजन करावे आणि विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, रुग्ण तसेच व्यापाऱ्यांना दिलासा द्यावा, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.
यावेळी ओमकार सातपुते, जयेश ओसवाल, राहुल कटारिया, विनायक चुंबळकर, उमेश रणदिवे, महेंद्र देसाई, सुजित वाघमारे, भीषण दुमावत यांच्यासह अन्य व्यापारी उपस्थित होते.

✍🏻मुख्य संपादक – संदिप बारटक्के






















