✍️ संदिप बारटक्के
दौंड : शहरातील नवयुग मित्र मंडळाच्या वतीने गणेश उत्सवानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या खेळ रंगला पैठणीचा या मनोरंजनात्मक कार्यक्रमाला महिला भगिनींचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या कार्यक्रमामध्ये अनेक महिला भगिनींनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेत विविध स्पर्धांचा आनंद लुटला.
प्रथम क्रमांकाचे पारितोषिक नीतू बाबू म्हेत्रे यांनी पटकावले. द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक पिंकी येरमाळे यांनी मिळवले, तर तृतीय क्रमांकाचे पारितोषिक मंजुळा विंचूरकर यांनी पटकावले. तसेच विविध स्पर्धांमध्ये सहभागी झालेल्या अनेक महिला भगिनींना पारितोषिके देऊन नवयुग मित्र मंडळाच्या वतीने सन्मानित करण्यात आले.
या कार्यक्रमाचे उद्घाटन माजी नगराध्यक्षा शीतल योगेश कटारिया यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी नगरसेविका रुचिता कटारिया आणि माजी नगरसेविका अरुणा डहाळे उपस्थित होते.
कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरले ते ज्येष्ठ नागरिक महिलांनी सादर केलेले सुंदर नृत्य. आपल्या अप्रतिम नृत्याविष्कारातून ज्येष्ठ महिलांनी उपस्थितांची मने जिंकली. त्यांच्या उत्साहाचे आणि कलागुणांचे कौतुक करत मंडळाच्या वतीने सर्व ज्येष्ठ नागरिक महिलांचा विशेष सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाचे सुंदर सादरीकरण संतोष सोनवणे सर यांनी केले. आपल्या प्रभावी निवेदनातून त्यांनी कार्यक्रमात उत्साह आणि मनोरंजनाची रंगत वाढवली.
या कार्यक्रमासाठी अनेक महिलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी नवयुग मित्र मंडळाचे महिला पदाधिकारी प्रिया नारंग, दीपा भालेराव, साधना बलदोटा, प्रगती टाटिया, समयरा नारंग, रूपाली खादगे यांचे विशेष सहकार्य मिळाले.
नवयुग मित्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी नगरसेवक मोहन नारंग तसेच नवयुग श्री गणेश मंदिराचे प्रमुख राहुल भालेराव यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
यावेळी मंडळाचे सुरेंद्र बलदोटा, आनंद बलदोटा, वैभव टाटिया, प्रशांत खादगे उपस्थित होते.

✍🏻मुख्य संपादक – संदिप बारटक्के






















