✍️ संदिप बारटक्के
दौंड : शिक्षणासाठी दररोज तीन ते चार किलोमीटरचा प्रवास करणाऱ्या जिल्हा परिषद शाळेतील गरजू विद्यार्थिनींची अडचण लक्षात घेऊन वीर बाजी पासलकर मित्रमंडळाच्या वतीने दोन विद्यार्थिनींना सायकलींचे वाटप करण्यात आले. गणेशोत्सवाच्या निमित्ताने राबविण्यात आलेल्या या आगळ्यावेगळ्या सामाजिक उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थी व विद्यार्थिनींना शिक्षणासाठी दररोज लांबचा प्रवास करावा लागतो. वाहतुकीची पुरेशी साधने उपलब्ध नसल्याने त्यांना पायी अथवा इतर साधनांवर अवलंबून राहावे लागते. ही बाब लक्षात घेऊन वीर बाजी पासलकर मित्र मंडळाने गरजू विद्यार्थिनींच्या शिक्षणाचा प्रवास सुलभ करण्याचा संकल्प केला. त्यानुसार दोन गरजू विद्यार्थिनींची निवड करून त्यांना सायकली प्रदान करण्यात आल्या.
या उपक्रमामुळे विद्यार्थिनींचा शाळेत ये-जा करण्यासाठी लागणारा वेळ व श्रम कमी होणार असून त्यांच्या शिक्षणाला अधिक चालना मिळण्यास मदत होणार आहे. सामाजिक बांधिलकी जपत मंडळाने राबविलेल्या या उपक्रमातून ‘शिक्षणासाठी मदतीचा हात’ हा सकारात्मक संदेश देण्यात आला.
यावेळी पुणे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष वीरधवल जगदाळे, डॉ. प्रसाद कोल्हे, डॉ. भाग्यश्री कोल्हे, राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक ५ चे पोलीस निरीक्षक अविनाश हराळ, आयसीआयसीआय बँकेचे मॅनेजर दत्तात्रय चव्हाण तसेच निर्मला सत्यनारायण भुतडा यांच्या उपस्थितीत विद्यार्थिनींना सायकलींचे वाटप करण्यात आले.
यावेळी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, या सामाजिक उपक्रमासाठी अनेकांचे सहकार्य व आशीर्वाद लाभले. समाजातील नागरिकांनी दिलेले प्रेम, सहकार्य आणि पाठिंबा यापुढेही कायम राहावा, तसेच गरजू विद्यार्थ्यांसाठी अशाच प्रकारचे उपक्रम अविरतपणे राबविण्याची संधी मिळावी, अशी भावना व्यक्त करण्यात आली.
मंडळाच्या या उपक्रमामुळे गणेशोत्सवाला सामाजिक बांधिलकीची जोड मिळाली असून, विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी केलेल्या या मुदतीचे उपस्थित मान्यवरांनी कौतुक केले.

✍🏻मुख्य संपादक – संदिप बारटक्के






















