✍️ संदिप बारटक्के
दौंड : एल निनोच्या प्रभावामुळे यंदा पाऊस कमी असल्याने पाणीटंचाईची भीषण परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेता दौंड शहरात आतापासूनच पाणी बचतीसाठी ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी भारत अगस्ट करप्शनचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रोहित राजेश पाटील यांनी दौंड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अवधूत तावडे यांच्याकडे केली आहे.
याबाबत दौंड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे. शहरातील पाणीगळतीच्या समस्येकडे तातडीने लक्ष देऊन गळती होत असलेल्या पाइपलाइन व नळांची दुरुस्ती करावी. तसेच खराब झालेले नळ व पाइपलाइन बदलण्यात याव्यात. सार्वजनिक नळांना तोट्या बसवून पाण्याचा होणारा अपव्यय रोखावा, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
दौंड शहरातील अनेक ठिकाणी पाणीपुरवठ्यादरम्यान पाइपलाइन तसेच नळांमधून मोठ्या प्रमाणात पाण्याची गळती होत असल्यास त्याचा थेट परिणाम उपलब्ध पाणीसाठ्यावर होतो. त्यामुळे पाणीटंचाई निर्माण होण्यापूर्वीच नगरपरिषदेने प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे आवश्यक असल्याचे रोहित राजेश पाटील यांनी म्हटले आहे.
याशिवाय शहरातील पाणीपुरवठ्याचे योग्य नियोजन करून पाण्याचा अनावश्यक वापर रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना कराव्यात. नागरिकांमध्येही पाणी बचतीबाबत व्यापक जनजागृती करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
पाणी जपून वापरा, नळ सुरू ठेवून पाणी वाहू देऊ नका, नळाला तोटी नसेल तर ती बसवा, गळतीचे नळ तातडीने दुरुस्त करा आणि पाण्याचा अनावश्यक वापर टाळा, असे आवाहन नागरिकांना करण्यात यावे, अशी सूचना निवेदनातून करण्यात आली आहे.
‘पाणी वाचवा – पाणीटंचाई टाळा’ या संदेशातून दौंड शहरात विशेष जनजागृती मोहीम राबवावी. शाळा, महाविद्यालये, सार्वजनिक ठिकाणे तसेच विविध नागरी भागांमध्ये पाणी बचतीचे महत्त्व नागरिकांपर्यंत पोहोचवावे, अशीही मागणी रोहित राजेश पाटील यांनी केली आहे.
आगामी काळात पाण्याची संभाव्य टंचाई लक्षात घेता प्रशासनाने केवळ टंचाई निर्माण झाल्यानंतर उपाययोजना करण्याऐवजी आतापासूनच पाणी बचत, गळती नियंत्रण आणि जनजागृतीवर भर द्यावा, अशी अपेक्षा रोहित पाटील यांनी व्यक्त केली आहे.

✍🏻मुख्य संपादक – संदिप बारटक्के






















