.
✍️ संदिप बारटक्के
दौंड : आषाढी एकादशीचे औचित्य साधून डॉ. हेडगेवार स्मृती समिती, दौंड यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या शालेय दिंडी स्पर्धा यंदाही भक्तिमय वातावरणात आणि मोठ्या उत्साहात संपन्न झाल्या. शहरातील विविध शाळांतील शेकडो विद्यार्थ्यांनी वारकरी वेशभूषा परिधान करून, टाळ-मृदुंगाच्या गजरात, भगवा पताका फडकवत तसेच विठ्ठल-रुक्मिणी, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम आदी संतांच्या वेशभूषेत आकर्षक दिंड्या सादर करत संपूर्ण परिसर भक्तिरसाने भारावून टाकला.
दिंडी स्पर्धेचे उद्घाटन नगरसेवक तथा गटनेते जीवराज पवार यांच्या हस्ते करण्यात आले. दि. २४ जुलै रोजी शिशु गट इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांच्या स्पर्धा पार पडल्या, तर दि. २५ जुलै रोजी आषाढी एकादशीच्या दिवशी इयत्ता पाचवी ते सातवी (मध्यम गट) आणि इयत्ता आठवी ते दहावी (मोठा गट) या गटांच्या स्पर्धा उत्साहात पार पडल्या.
समितीचे अध्यक्ष दत्ताजी शिनोलीकर आणि उपाध्यक्ष राजेंद्र थोरात यांच्या नेतृत्वाखाली स्पर्धेचे उत्कृष्ट नियोजन करण्यात आले. विजेत्या शाळांना डॉ. समीर कुलकर्णी व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके, सन्मानचिन्हे आणि प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आली.
स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे :
शिशु गट :
प्रथम – रत्नदीप बालक मंदिर
द्वितीय – सिद्धेश्वर प्री-प्रायमरी
तृतीय – राधा किड्स
उत्तेजनार्थ – स्वरनाथ विद्यालय, सरस्वती बालक मंदिर, ब्लॉसम नर्सरी, शिशु विकास मंदिर
लहान गट (इयत्ता १ ली ते ४ थी) :
प्रथम – के. के. इंटरनॅशनल स्कूल (वायरलेस फाटा)
द्वितीय – मातोश्री पार्वतीबाई कुंभार विद्यालय
तृतीय – शांताबाई ठोंबरे विद्यालय
उत्तेजनार्थ – ब्लॉसम स्कूल, शिशु विकास मंदिर, नवयुग शिक्षण संस्था
मध्यम गट (इयत्ता ५ वी ते ७ वी) :
प्रथम – लर्न अँड प्ले स्कूल
द्वितीय – शिशु विकास मंदिर
तृतीय – मंगेश मेमोरियल
उत्तेजनार्थ – श्रीमती शांताबाई ठोंबरे विद्यालय, नवयुग प्राथमिक विद्यालय
मोठा गट (इयत्ता ८ वी ते १० वी) :
प्रथम – संत तुकडोजी विद्यालय
द्वितीय – लर्न अँड प्ले स्कूल
तृतीय – लाजवंती गरेला हायस्कूल
उत्तेजनार्थ – ब्लॉसम स्कूल
स्पर्धेचे परीक्षण अशोक दीक्षित, जगन्नाथ मंडालकर, माधवी मंडालकर, वैशाली चौधरी, प्रतिभा कुलकर्णी, निलीमा काळे आणि सुनील पवार यांनी केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनंत दंडवते यांनी केले, तर शाम वाघमारे यांनी आभार मानले.
दिंडी स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी समितीचे कार्यकारी सभासद दिलीप लोकरे, राघवेंद्र देशपांडे, चांगदेव गाडीलकर, प्रमोद कबनुरकर, सुनील बंडगिरी आणि शाम वाघमारे यांनी विशेष परिश्रम घेतले.
आषाढी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त आयोजित या दिंडी स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांमध्ये वारकरी परंपरा, संतांचे विचार, भक्तीभाव आणि सांस्कृतिक मूल्यांची जोपासना झाली. विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग, पालकांची उपस्थिती आणि नागरिकांचा प्रतिसाद यामुळे हा सोहळा संस्मरणीय ठरला.

✍🏻मुख्य संपादक – संदिप बारटक्के


























