✍️ संदिप बारटक्के
दौंड : शहरातील संस्कार प्रायमरी अॅण्ड हायस्कूल येथे नवरात्रोत्सव मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला. पारंपरिक वेशभूषेतील विद्यार्थ्यांनी दांडिया-गरबा, तसेच नृत्याचे आकर्षक सादरीकरण केले. आणि देवी दुर्गेच्या नऊ रूपांचे साकारलेले देखणे रूप यामुळे कार्यक्रमाला विशेष रंगत आली. विद्यार्थिनींनी सादर केलेल्या देवीच्या नऊ रूपांनी उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.
शाळेच्या प्रांगणात आयोजित करण्यात आलेल्या या सोहळ्यात भारतीय संस्कृती, परंपरा आणि स्त्रीशक्तीचा गौरव पाहायला मिळाला. रंगीबेरंगी पारंपरिक वेशभूषा, तालबद्ध दांडिया-गरबा आणि उत्साहपूर्ण नृत्याविष्कारांमुळे संपूर्ण परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना उपस्थित मान्यवर आणि पालकांकडून उत्स्फूर्त दाद मिळाली.
विशेष या कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण म्हणजे देवी दुर्गेची नऊ रूपे साकारणाऱ्या विद्यार्थिनींचे सादरीकरण. आकर्षक वेशभूषा आणि प्रभावी सादरीकरणातून विद्यार्थिनींनी देवीशक्तीचे महत्त्व, स्त्रीशक्तीचा गौरव आणि नवरात्रोत्सवाचे आध्यात्मिक महत्त्व अधोरेखित केले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये भारतीय संस्कृतीविषयी आदर, परंपरांची जपणूक आणि कलात्मक अभिव्यक्तीला प्रोत्साहन मिळाले.
या कार्यक्रमाला संस्कार स्कूलचे संस्थापक जयंत पवार, संचालिका अरुणा पवार, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रतिभा पवार, मुख्याध्यापिका सुनिता मिनिगी, दौंड नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्षा छाया थोरात, दौंड सिद्धेश्वर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हरिभाऊ ठोंबरे, दौंड पंचायत समितीचे सभापती सुखदेव चोरमले, नगरसेवक विजय बोरकर, नगरसेवक निलेश पवार, शिवव्याख्याते राहुल शिंदे, पर्यवेक्षक मंगेश साठे, नृत्यदिग्दर्शक व पर्यवेक्षक आरव सोनवणे, ॲड. कावेरी गुरसळ आणि आशा सेविका शीला वाघमारे यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शारदा भोसले आणि महेक गिदवाणी यांनी केले, तर सुनिता गायकवाड यांनी आभार मानले. शाळा आणि पालक यांच्यातील स्नेहबंध दृढ करण्यासोबतच विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास, सांघिक भावना आणि सांस्कृतिक मूल्यांची रुजवण करणारा हा नवरात्रोत्सव उत्साहात पार पडला.

✍🏻मुख्य संपादक – संदिप बारटक्के






















