दिनेश पवार : विशेष प्रतिनिधी
रयत शिक्षण संस्थेचे एस. एम. जोशी कॉलेज, हडपसर, पुणे येथील रयत स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या वतीने स्पर्धा परीक्षांमध्ये उल्लेखनीय यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ व स्पर्धा परीक्षेच्या फाउंडेशन बॅचचा शुभारंभ आयोजित करण्यात आला. कार्यक्रमास सुरेश लक्ष्मी बाबुराव जायभाय (पी.एस.आय. पोलीस ट्रेनिंग सेंटर, खंडाळा) हे प्रमुख पाहुणे, तर महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो. डॉ. एकनाथ मुंढे अध्यक्ष म्हणून उपस्थित होते. प्रमुख पाहुणे सुरेश लक्ष्मी बाबुराव जायभाय यांच्या हस्ते स्पर्धा परीक्षेच्या फाउंडेशन बॅचचा शुभारंभ करण्यात आला.
यावेळी मार्गदर्शन करताना सुरेश लक्ष्मी बाबुराव जायभाय म्हणाले की, स्पर्धा परीक्षेची तयारी करताना सातत्य, शिस्त, योग्य नियोजन आणि कठोर परिश्रम या बाबींना विशेष महत्त्व आहे. विद्यार्थ्यांनी निश्चित ध्येय ठेवून सातत्य, चिकाटी आणि मेहनतीच्या जोरावर स्पर्धा परीक्षेची तयारी करावी. तसेच विद्यार्थ्यांनी आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित करून सकारात्मक दृष्टिकोनातून अभ्यास करावा, असे आवाहन त्यांनी केले.
अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना प्राचार्य प्रो. डॉ. एकनाथ मुंढे म्हणाले की, रयत स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या माध्यमातून अनेक विद्यार्थी अधिकारी पदावर विराजमान व्हावेत आणि त्यांनी महाविद्यालयाचा नावलौकिक वाढवावा, ही अपेक्षा आहे. महाविद्यालयाच्या वतीने स्पर्धा परीक्षांसाठी उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या विविध शैक्षणिक सुविधांचा विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा.
कार्यक्रमाच्या प्रसंगी प्रमुख पाहुणे व अध्यक्ष यांच्या हस्ते स्पर्धा परीक्षांमध्ये उल्लेखनीय यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या यशातून इतर विद्यार्थ्यांनी प्रेरणा घ्यावी, असे आवाहन करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व प्रमुख पाहुण्यांचा परिचय रयत स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या चेअरमन डॉ. छाया सकटे यांनी करून दिला. आभार समन्वयक प्रा. अजित भोसले यांनी मानले, तर सूत्रसंचालन डॉ. शीतल चौरे यांनी केले. कार्यक्रमास महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. संजय जगताप, प्रा. सुरज मधाळे, प्राध्यापक, रयत स्पर्धा परीक्षा अकॅडमीचे विद्यार्थी तसेच विविध मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

✍🏻मुख्य संपादक – संदिप बारटक्के






















