✍️ संदिप बारटक्के
दौंड : दौंड शहरातील स्पंदन होमिओपॅथी क्लिनिकचे होमिओपॅथी तज्ज्ञ डॉ. प्रशांत घोंडगे यांनी केलेल्या संशोधनाला जागतिक स्तरावर मान्यता मिळाली असून त्यांचा संशोधन पेपर इंटरनॅशनल ॲडव्हान्स जर्नल ऑफ ॲडव्हान्स रिसर्च पब्लिकेशनमध्ये प्रकाशित झाले आहे. त्यामुळे दौंड शहराच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.
डॉ. घोंडगे यांनी गेल्या १६ वर्षांपासून किडनी स्टोन (मुतखडा) आणि होमिओपॅथी उपचारपद्धती या विषयावर सातत्याने संशोधन केले आहे. या कालावधीत त्यांनी अनेक रुग्णांवर उपचार करून त्यांचे अनुभव, निरीक्षणे आणि संशोधन निष्कर्ष वैज्ञानिक पद्धतीने मांडले. या अभ्यासाच्या आधारे त्यांनी तयार केलेल्या संशोधन पेपरला आंतरराष्ट्रीय स्तरावरील संशोधन नियतकालिकामध्ये स्थान मिळाले आहे.
मुतखड्याच्या उपचारांमध्ये होमिओपॅथीची भूमिका, उपचारांदरम्यानचे निरीक्षण, रुग्णांच्या अनुभवांचे विश्लेषण आणि दीर्घकालीन परिणाम यांचा सखोल अभ्यास या संशोधनात करण्यात आला आहे. या यशामुळे डॉ. घोंडगे यांच्या कार्याची दखल जागतिक स्तरावर घेण्यात आली आहे.
सध्या डॉ. प्रशांत घोंडगे यांचे कॅन्सर, पित्ताशयातील खडे (Gall Bladder Stones) आणि मधुमेह या विषयांवरही संशोधन सुरू असून, भविष्यात या क्षेत्रातही महत्त्वपूर्ण संशोधन निष्कर्ष समोर येण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
दौंडसारख्या शहरात अल्पदरात होमिओपॅथी उपचार सेवा उपलब्ध करून देत असतानाच डॉ. घोंडगे हे आनंद होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज येथे सहाय्यक प्राध्यापक (Assistant Professor) म्हणून कार्यरत आहेत. अध्यापनासोबतच ते नवीन होमिओपॅथी डॉक्टर घडविण्याचे महत्त्वपूर्ण कार्यही करत आहेत.
दरम्यान, शासनाच्या नव्या निर्णयानुसार शासकीय रुग्णालयांमध्ये कॅन्सर रुग्णांसाठी होमिओपॅथीचा सहाय्यक उपचार प्रणाली (Supportive Care) म्हणून वापर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर गरज भासेल त्या ठिकाणी कॅन्सर रुग्णांना सहाय्यक उपचार आणि मार्गदर्शन करण्यासाठी आपणही योगदान देणार असल्याचे डॉ. प्रशांत घोंडगे यांनी सांगितले.
डॉ. घोंडगे यांच्या या आंतरराष्ट्रीय यशाबद्दल वैद्यकीय क्षेत्रासह दौंड शहरातून त्यांचे अभिनंदन होत असून, त्यांच्या संशोधन कार्यामुळे होमिओपॅथी क्षेत्रात नवीन दिशा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

✍🏻मुख्य संपादक – संदिप बारटक्के






















