✍️ संदिप बारटक्के
दौंड : दौंड नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेचे सलग दुसऱ्यांदा अधिकृत युट्युब व फेसबुक लाईव्हद्वारे थेट प्रक्षेपण करण्यात आले. नगराध्यक्षा दुर्गादेवी इंद्रजीत जगदाळे यांच्या सूचनेनुसार राबविण्यात आलेल्या या अभिनव उपक्रमाला शहरासह संपूर्ण तालुक्यातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून नागरिकांकडून त्याचे मोठ्या प्रमाणात स्वागत होत आहे.
या थेट प्रक्षेपणामुळे नागरिकांना नगरपालिकेची सर्वसाधारण सभा नेमकी कशी चालते, विविध विकासकामांवर कशाप्रकारे चर्चा होते, लोकप्रतिनिधी कोणते प्रश्न मांडतात, प्रशासनाची भूमिका काय असते आणि निर्णय प्रक्रिया कशी पार पडते, हे प्रत्यक्ष पाहण्याची संधी मिळत आहे. त्यामुळे नगरपालिकेच्या कामकाजातील पारदर्शकता अधिक अधोरेखित होत असून नागरिकांचा स्थानिक स्वराज्य संस्थेवरील विश्वास अधिक दृढ होत असल्याच्या प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त होत आहेत.
नगराध्यक्षा दुर्गादेवी इंद्रजीत जगदाळे या महाराष्ट्रातील कमी वयातील नगराध्यक्षांपैकी एक असून पश्चिम महाराष्ट्र व कोकण विभागाच्या सरचिटणीस म्हणूनही कार्यरत आहेत. नागरिकांना प्रशासनाशी अधिक जवळून जोडणे, लोकप्रतिनिधींचे कामकाज सर्वांसमोर खुलेपणाने मांडणे आणि पारदर्शक, उत्तरदायी व लोकाभिमुख प्रशासनाची संकल्पना अधिक बळकट करणे, या उद्देशाने त्यांनी हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
या उपक्रमामुळे अनेक नागरिकांनी, “नगरपालिकेत नेमके काय चालते, कोणते विषय मांडले जातात आणि शहराच्या विकासासाठी निर्णय कसे घेतले जातात, हे आता प्रत्यक्ष समजू लागले आहे. प्रशासनातील पारदर्शकतेकडे टाकलेले हे महत्त्वपूर्ण पाऊल आहे,” अशा सकारात्मक प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.
सभेच्या शेवटी नगराध्यक्षा दुर्गादेवी इंद्रजीत जगदाळे यांनी प्रशासन अधिक कार्यक्षम, शिस्तबद्ध आणि पारदर्शक होण्यासाठी काही महत्त्वपूर्ण सूचना दिल्या. नगरपरिषदेच्या विकासकामांबाबत, नागरिकांच्या समस्या तसेच इतर प्रशासकीय बाबींमध्ये संबंधित नगरसेवक व नगरसेविकांनी स्वतः पुढाकार घेऊन प्रशासनाशी समन्वय साधावा, असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच नगरसेवक व नगरसेविकांचे पती, कुटुंबीय किंवा इतर नातेवाईक यांनी नगरपरिषदेच्या प्रशासकीय कामकाजात कोणत्याही प्रकारचा हस्तक्षेप करू नये. सर्व कामकाज कायदा, नियम व विहित प्रशासकीय प्रक्रियेनुसारच पार पाडण्यात यावे, अशा स्पष्ट सूचना त्यांनी दिल्या.
याचबरोबर नगरपरिषदेकडून एखाद्या विकासकामाचा कार्यादेश (वर्क ऑर्डर) प्राप्त झाल्यानंतर संबंधित ठेकेदाराने एक महिन्यांच्या आत प्रत्यक्ष कामास सुरुवात करणे बंधनकारक राहील, असेही त्यांनी सांगितले. विनाकारण विलंब झाल्यास संबंधित ठेकेदाराविरुद्ध नियमानुसार कार्यवाही करून ब्लॅकलिस्ट करण्याची प्रक्रिया राबविण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला.
तसेच ठेकेदारांनी केवळ त्यांना मंजूर करण्यात आलेल्या कामापुरतेच नगरपरिषदेशी संबंध ठेवावेत. नगरपरिषदेच्या इतर प्रशासकीय कामकाजात कोणत्याही प्रकारचा हस्तक्षेप करू नये तसेच अधिकारी व कर्मचाऱ्यांशी अयोग्य वर्तन, वादावादी अथवा दबाव आणण्याचा प्रयत्न करू नये. अशा प्रकारचे वर्तन आढळून आल्यास संबंधित ठेकेदाराविरुद्ध प्रचलित नियमांनुसार योग्य ती कारवाई करून ठेका रद्द करण्यात येईल असेही नगराध्यक्षा दुर्गादेवी इंद्रजीत जगदाळे यांनी स्पष्ट केले.
याशिवाय, सर्वसाधारण सभेत दौंड शहराच्या विकासाशी संबंधित जवळपास सर्वच महत्त्वाचे विषय मंजूर करण्यात आले. या मंजूर विषयांमुळे शहरातील विविध विकासकामांना अधिक गती मिळणार असून नागरिकांच्या मूलभूत सुविधांमध्येही सकारात्मक बदल होण्यास मदत होणार आहे. सभेत मंजूर झालेल्या सर्व महत्त्वाच्या विषयांची सविस्तर माहिती व सभेचा अजेंडा नगरपरिषदेच्या अधिकृत संकेतस्थळावर लवकरच प्रसिद्ध करण्यात येणार असल्याची माहितीही नगराध्यक्षा दुर्गादेवी इंद्रजीत जगदाळे यांनी दिली.
दौंड शहरात या निर्णयाची मोठ्या प्रमाणावर चर्चा सुरू असून, लोकशाही अधिक सक्षम करण्यासाठी, प्रशासनातील पारदर्शकता वाढविण्यासाठी, विकासकामांना गती देण्यासाठी आणि नागरिकांचा सहभाग अधिक प्रभावी करण्यासाठी हा उपक्रम निश्चितच आदर्श ठरणार असल्याचे मत विविध स्तरांतून व्यक्त होत आहे.

✍🏻मुख्य संपादक – संदिप बारटक्के






















