वृत्तवेध मarathi / संदिप बारटक्के
दौंड : शहरातील नागरिकांसाठी आणि भावी पिढीला राष्ट्रभक्तीची प्रेरणा देणारे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे स्मृती स्मारक आणि देखणा अर्धाकृती पुतळा पूर्णत्वास आला असला, तरी शासकीय परवानग्यांच्या लालफितीमुळे त्याचे लोकार्पण अद्याप रखडले आहे. आमदार राहुल कुल यांनी आपल्या आमदार स्थानिक विकास निधीतून १५ लाख रुपये उपलब्ध करून दिल्यामुळे हे स्मारक उभारण्यात आले आहे.
स्मारकाचे बांधकाम आणि पुतळ्याचे काम पूर्ण झाल्यानंतर आता केवळ अंतिम शासकीय मंजुरी आणि उद्घाटनाची औपचारिकता बाकी आहे. मात्र, विविध विभागांकडून आवश्यक अंतर्गत परवानग्या मिळण्यात होत असलेल्या विलंबामुळे हे लोकार्पण पुढे ढकलले जात असल्याची माहिती समोर आली आहे.
विशेष म्हणजे, स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या अर्धाकृती पुतळ्याच्या क्ले मॉडेलला ‘कला उपसंचालक, कला संचालनालय, मुंबई’ यांच्याकडून १६ मार्च २०२६ रोजीच मंजुरी मिळाली होती. त्यानंतर दौंड नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांनी २३ एप्रिल २०२६ रोजी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मुख्य वास्तुशास्त्रज्ञांकडे, मुंबई स्मारकाच्या बांधकाम आराखड्याच्या अंतिम मंजुरीसाठी रीतसर प्रस्ताव सादर केला आहे.
दौंड शहरातील नागरिकांमध्ये याबाबत नाराजीची भावना व्यक्त होत आहे. लोकप्रतिनिधींनी निधी उपलब्ध करून देत काम पूर्ण केले असतानाही केवळ प्रशासकीय प्रक्रियेतील विलंबामुळे स्मारकाचे उद्घाटन रखडणे योग्य नसल्याचे मत नागरिक व्यक्त करत आहेत.
दरम्यान, दौंड नगरपरिषद प्रशासनाकडून आवश्यक परवानग्या लवकर मिळाव्यात यासाठी सातत्याने पाठपुरावा सुरू असल्याचे सांगितले जात आहे. आता शासकीय मंजुरीचा अडथळा दूर होऊन स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या स्मृतीस अभिवादन करणाऱ्या या भव्य स्मारकाचे लोकार्पण नेमके कधी होणार, याकडे संपूर्ण दौंडकरांचे लक्ष लागले आहे.

✍🏻मुख्य संपादक – संदिप बारटक्के






















