वृत्तवेध मarathi / संदिप बारटक्के
दौंड : पुणे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष वीरधवल जगदाळे पाटील, नगरसेवक इंद्रजित जगदाळे पाटील यांच्या मातोश्री तथा दौंड तालुक्याच्या माजी आमदार उषादेवी कृष्णराव जगदाळे पाटील यांचे वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने दौंड तालुक्याच्या राजकीय, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रावर शोककळा पसरली आहे.
उषादेवी जगदाळे पाटील यांना संपूर्ण दौंड तालुका प्रेमाने “माँ” या नावाने ओळखत होता. औपचारिक आदरार्थी संबोधनाच्या पलीकडे जाऊन त्यांनी आपल्या ममत्वपूर्ण स्वभावाने आणि सर्वसामान्यांशी जोडलेल्या नात्याने जनमानसात विशेष स्थान निर्माण केले होते. शालीनता, राजसपणा आणि लोकाभिमुख नेतृत्व यांचा सुंदर संगम त्यांच्या व्यक्तिमत्त्वात दिसून येत होते.
दौंड शहर व तालुक्याच्या राजकीय इतिहासात प्रथम स्त्री नेतृत्त्व म्हणून त्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली. परंपरेने लाभलेला सामाजिक मान आणि लोकशाही प्रक्रियेतून मिळालेला जनाधार यांचा त्यांनी अत्यंत संयमाने व जबाबदारीने उपयोग केला. त्यांच्या कार्यकाळात सामाजिक बांधिलकी, सर्वसामान्य नागरिकांप्रती असलेली आत्मीयता आणि विकासाभिमुख दृष्टिकोन यामुळे त्या जनतेच्या मनात कायमच्या घर करून राहिल्या.
त्यांच्या निधनाची बातमी समजताच विविध राजकीय, सामाजिक, शैक्षणिक तसेच व्यावसायिक क्षेत्रातील मान्यवरांनी दुःख व्यक्त केले आहे. दौंड तालुक्याने एक संवेदनशील, संयमी आणि मातृवत नेतृत्व गमावल्याची भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहे.
“माँ” यांच्या आत्म्यास शांती लाभो आणि जगदाळे परिवाराला या दुःखद प्रसंगातून सावरण्याची शक्ती मिळो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
“माँ” आपल्याला अखेरचा दंडवत…

✍🏻मुख्य संपादक – संदिप बारटक्के


























