वृत्तवेध मarathi / संदिप बारटक्के
पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात वाढलेल्या बिबट्यांच्या वावरामुळे शेतकरी आणि नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या गंभीर परिस्थितीवर तातडीने उपाययोजना कराव्यात आणि शेतकऱ्यांच्या सुरक्षेसाठी रात्रीऐवजी दिवसा वीज पुरवठा करावा, अशी आग्रही मागणी आमदार राहुल कुल यांनी आज विधानसभेत ‘औचित्याच्या मुद्या’द्वारे केली.
सभागृहाचे लक्ष वेधताना त्यांनी सांगितले की, पुणे जिल्ह्याच्या विविध भागांत बिबट्यांच्या हल्ल्यांचे प्रमाण वाढले आहे. शेतात कामासाठी जाणाऱ्या शेतकऱ्यांवर हल्ले होत असून, ग्रामीण भागात दहशतीचे वातावरण आहे. शासनाने उपाययोजना जाहीर केल्या असल्या तरी त्यांची अंमलबजावणी अधिक वेगाने होणे गरजेचे आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
रात्रीच्या वेळी शेतीपंपासाठी पाणी भरण्यासाठी शेतात जावे लागते, त्यावेळी बिबट्यांचा धोका अधिक असतो. त्यामुळे शेतकऱ्यांच्या जीवित सुरक्षेच्या दृष्टीने वीज वितरण कंपनीने दिवसा वीज पुरवठा करावा, अशी ठाम मागणी त्यांनी केली.
बिबट्यांच्या वाढत्या हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर वनविभागाने तातडीने पिंजरे लावणे, नियमित गस्त घालणे तसेच प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवाव्यात, अशी विनंती त्यांनी माननीय मुख्यमंत्री आणि वनमंत्री यांच्याकडे केली.
शेतकऱ्यांच्या सुरक्षिततेच्या आणि हक्काच्या प्रश्नावर शासन सकारात्मक निर्णय घेईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
◼️ सहकारी वीज संस्थांनाही सवलत द्या.
“राज्य सरकारने सामान्य शेतकऱ्यांच्या वीज बिलात सवलत किंवा माफी जाहीर केली आहे. मात्र ग्रामीण भागातील जे छोटे शेतकरी एकत्र येऊन ‘सहकारी वीज संस्थां’च्या माध्यमातून शेतीपंपासाठी वीज घेतात, त्यांना अद्याप ही सवलत मिळालेली नाही. हे शेतकरी अत्यंत लहान घटक असून, त्यांनाही वीज बिलातून माफी किंवा सवलत देण्यात यावी, असा महत्त्वपूर्ण मुद्दा आमदार कुल यांनी सभागृहात मांडला” .

✍🏻मुख्य संपादक – संदिप बारटक्के


























