अख्तर काझी
दौंड : नगरपरिषदेच्या वतीने,शहरासाठी राज्य शासनाने उपलब्ध करून दिलेल्या सेक्शन कम जेटिंग मशीन व अग्निशमन दलासाठी दोन गोरखा वाहनांचे( रेस्क्यू वाहन) आज लोकार्पण करण्यात आले.
तसेच स्वच्छ भारत अभियानांतर्गत नगरपालिकेतील सफाई कर्मचाऱ्यांना सुरक्षा साहित्याचे(सेफ्टी किट,1 लाख 73 हजार रु.) वाटप करण्यात आले.
यावेळी नगराध्यक्षा दुर्गादेवी जगदाळे, उपनगराध्यक्षा छाया थोरात, मुख्याधिकारी अवधूत तावडे, गटनेते योगेश कटारिया व जीवराज पवार, आरोग्य समिती सभापती कार्तिकी सोनवणे, आरोग्य निरीक्षक स्नेहल खुडे तसेच दोन्ही गटातील नगरसेवक, न.पा. तील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
स्वच्छ भारत अभियानांतर्गत नगरपालिकेतील 72 सफाई कर्मचाऱ्यांना सुरक्षा साहित्य वाटप करण्यात आले आहे तसेच शहर स्वच्छतेसाठी लागणारे सेक्शन कम जेटिंग मशीनचे लोकार्पण करण्यात आले असल्याची माहिती आरोग्यनिरीक्षक स्नेहल खुडे व शाहू पाटील यांनी दिली.
शहरातील सर्वच प्रभागांमध्ये स्वच्छतेची कामे करताना सफाई कर्मचाऱ्यांना कोणतीही दुखापत होऊ नये तसेच त्यांच्या आरोग्याचा विचार या उद्देशाने सुरक्षा साहित्य उपलब्ध करून देण्यात आले असल्याचेही त्यांनी सांगितले.
नगराध्यक्ष दुर्गादेवी जगदाळे, न. पा. तील गटनेते योगेश कटारिया ,जीवराज पवार, नगरसेवक सागर जगताप यांनी स्वतः शहरासाठी लोकार्पण केलेली वाहने चालवीत शहरात फेरफटका मारला. शहर विकासासाठी दोन्ही गटातील नगरसेवकांनी एकत्र येत अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात सदरचा उपक्रम पार पाडल्याने उपस्थित कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण होते तसेच दौंडकरांनी सुद्धा याबाबत समाधान व्यक्त केले.

✍🏻मुख्य संपादक – संदिप बारटक्के






















