✍️ अख्तर काझी
दौंड : पुणे जिल्हा परिषद बांधकाम विभागाअंतर्गत दौंड-गोपाळवाडी मुख्य रस्त्याचे काम गेली पाच वर्षे संथ गतीने आणि टप्प्याटप्प्याने सुरू असून त्याची गुणवत्ता अत्यंत निकृष्ट असल्याची तक्रार दौंड पंचायत समितीचे माजी उपसभापती विकास कदम यांनी केली आहे. त्यांनी याबाबत जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या उपअभियंत्यांकडे लेखी तक्रार केली आहे.
कदम यांनी तक्रारी अर्जात म्हटले आहे की, या रस्त्याच्या कामकाजामुळे वाहतुकीस मोठा अडथळा निर्माण होत आहे. सरपंच वस्ती ते साखरे गॅरेज समोरील रस्ता एका महिन्यातच उखडला असून खडी वर येत आहे आणि सिमेंटकॉंक्रिटची धूळ उडत आहे. सध्या पावसाळा सुरू असताना मुख्य चौकातील रस्ता मोठा खड्डा करून उकरून ठेवला आहे. त्यामुळे पर्यायी रस्ता उपलब्ध करून दिला आहे; परंतु कमी पावसानेही त्यावर चिखल तयार होऊन गाड्या घसरत आहेत.
तसेच रस्त्याच्या खोदकामुळे दौंड नगरपरिषदेची मुख्य जलवाहिनी फुटल्याने बुधवारी सकाळी पाणी येण्याच्या वेळेस फुटलेल्या जलवाहिनीतून मोठ्या प्रमाणात सरपंच वस्ती येथे पुष्पलक्ष्मी हॉस्पिटल ते रचना अपार्टमेंट, समता नगरपर्यंत पाणी वाहत होते. या भागात ओढ्याचे स्वरूप निर्माण झाले आहे. नागरिकांना खड्यातून आणि चिखलातून प्रवास करावा लागत आहे.
कदम यांनी पर्यायी रस्त्यावर खडीकरण करण्याची, झालेल्या निकृष्ट कामाची चौकशी करण्याची आणि तो रस्ता पुन्हा उकरून नव्याने चांगल्या दर्जाचे काम करण्याची मागणी केली आहे. नगरपरिषद, पंचायत समिती, वीज वितरण, टेलिफोन आदी विभागांशी समन्वय नसल्याचेही त्यांनी निदर्शनास आणले आहे.

✍🏻मुख्य संपादक – संदिप बारटक्के






















