✍️ संदिप बारटक्के
दौंड : दौंड उपजिल्हा रुग्णालयाच्या आवारात सुरू असलेल्या विवाह नोंदणी केंद्रातील शहरातील नागरिकांची गैरसोय दूर करून विवाह नोंदणी व विवाह प्रमाणपत्र वितरणाची सुविधा दौंड नगरपालिकेमार्फत सुरू करण्यात यावी, अशी मागणी प्रभाग क्रमांक ६ च्या नगरसेविका स्वाती निलेश सावंत यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी दौंड नगरपालिकेचे मुख्याधिकारी अवधूत तावडे आणि उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. सचिन गुजर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
दौंड उपजिल्हा रुग्णालयाच्या आवारातील विवाह नोंदणी केंद्रात विवाह नोंदणी व प्रमाणपत्र मिळवण्यासाठी नागरिकांना विविध अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे नगरसेविका स्वाती सावंत यांनी निवेदनात म्हटले आहे. केंद्रात नागरिकांसाठी पुरेशी बसण्याची व्यवस्था नाही, पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध नाही, तसेच अपुऱ्या कर्मचारी वर्गामुळे कामकाजाला विलंब होत असल्याने नागरिकांना तासनतास ताटकळत बसावे लागत आहे.
तसेच महिला, ज्येष्ठ नागरिक आणि रोजंदारीवर काम करणाऱ्या नागरिकांना या गैरसोयींचा अधिक त्रास सहन करावा लागत आहे. विवाह नोंदणीसारख्या महत्त्वाच्या शासकीय सेवेसाठी नागरिकांना वारंवार हेलपाटे मारावे लागू नयेत आणि त्यांचा वेळ वाचावा, यासाठी प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी त्यांनी केली आहे.
विवाह नोंदणीसाठी येणाऱ्या नागरिकांना सन्मानपूर्वक आणि सोयीस्कर पद्धतीने सेवा मिळावी, यासाठी केंद्रात सुसज्ज प्रतीक्षा कक्ष, बसण्याची व्यवस्था आणि पिण्याच्या स्वच्छ पाण्याची सुविधा उपलब्ध करून द्यावी. तसेच आवश्यक कागदपत्रे, नोंदणी प्रक्रिया आणि शुल्क यांची सविस्तर माहिती देणारा स्पष्ट माहिती फलक केंद्राबाहेर लावण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
विवाह नोंदणीची प्रक्रिया अधिक सुलभ आणि पारदर्शक करण्यासाठी टोकन पद्धत सुरू करावी, ऑनलाइन अर्जाची सुविधा प्रभावीपणे राबवावी आणि कामाचा जलद निपटारा होण्यासाठी आवश्यक अतिरिक्त कर्मचारी उपलब्ध करून द्यावेत, असेही निवेदनात म्हटले आहे. महिला आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र प्राधान्य रांग सुरू केल्यास त्यांची गैरसोय कमी होण्यास मदत होईल, अशी भूमिका नगरसेविका स्वाती सावंत यांनी मांडली आहे.
दौंड शहरातील गावठाण भागातील अनेक महिला व पुरुष नागरिक रोजंदारीवर काम करतात. त्यांना प्रामुख्याने रविवारी सुट्टी मिळत असल्याने विवाह नोंदणी केंद्राच्या सध्याच्या कामकाजाच्या वेळेत सेवा घेणे अनेकदा शक्य होत नाही. विवाह नोंदणी केंद्र आठवड्यातील मर्यादित दिवशी सुरू राहत असल्याने नागरिकांची अडचण वाढत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
ही समस्या लक्षात घेऊन महिन्यातून एकदा प्रत्येक प्रभागात विवाह नोंदणीसाठी विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात यावे, अशी मागणी स्वाती सावंत यांनी केली आहे. यामुळे रोजंदारीवर काम करणाऱ्या नागरिकांना कामाचा दिवस बुडविल्याशिवाय विवाह नोंदणीची प्रक्रिया पूर्ण करता येईल आणि त्यांचा वेळ व आर्थिक नुकसानही टाळता येईल.
दौंड नगरपालिकेत स्वतंत्र विवाह नोंदणी कक्ष सुरू करण्याची मागणी
आजच्या डिजिटल युगात बहुतांश शासकीय सेवा ऑनलाइन उपलब्ध होत असताना विवाह नोंदणीसाठी नागरिकांना स्वतंत्र ठिकाणी जावे लागणे गैरसोयीचे ठरत आहे. त्यामुळे दौंड नगरपालिकेतील नागरी सुविधा केंद्र (CFC) किंवा ‘आपले सरकार’ सेवा केंद्राच्या माध्यमातून विवाह नोंदणीसाठी स्वतंत्र खिडकी सुरू करण्यात यावी, अशी मागणीही निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
याशिवाय विवाह नोंदणीपासून प्रमाणपत्र वितरणापर्यंतचे संपूर्ण कामकाज दौंड नगरपालिकेत सुरू करण्यासाठी आवश्यक प्रशासकीय कार्यवाही करण्यात यावी. या विषयाचे महत्त्व लक्षात घेऊन तो नगरपालिकेच्या आगामी सर्वसाधारण सभेच्या विषयपत्रिकेवर घेण्यात यावा, अशी विनंती नगरसेविका स्वाती सावंत यांनी केली आहे.
विवाह नोंदणी ही नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी संबंधित महत्त्वाची शासकीय सेवा आहे. त्यामुळे या सेवेचे कामकाज नागरिकाभिमुख, पारदर्शक आणि सुलभ असणे आवश्यक आहे. मूलभूत सुविधांचा अभाव, कर्मचाऱ्यांची कमतरता आणि मर्यादित कामकाजाच्या वेळेमुळे नागरिकांची होणारी गैरसोय दूर करण्यासाठी प्रशासनाने ठोस पावले उचलावीत, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
नगरसेविका स्वाती निलेश सावंत यांनी उपस्थित केलेल्या या प्रश्नांवर मुख्याधिकारी अवधूत तावडे आणि उपजिल्हा रुग्णालयाचे अधिकारी डॉ. सचिन गुजर प्रशासनाच्या स्तरावर कोणती कार्यवाही करतात, तसेच विवाह नोंदणी व प्रमाणपत्र वितरणाची सुविधा नगरपालिकेमार्फत सुरू करण्याबाबत काय निर्णय घेतला जातो, याकडे आता दौंडच्या नागरिकांचे लक्ष लागले आहे.

✍🏻मुख्य संपादक – संदिप बारटक्के






















