✍️ संदिप बारटक्के
दौंड : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर दौंड शहरातील गणेश विसर्जनाची व्यवस्था स्वच्छ, सुरक्षित आणि सुरळीत राहावी, यासाठी दौंड नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा दुर्गादेवी इंद्रजीत जगदाळे यांच्या प्रमुख उपस्थितीत शहरातील विसर्जन घाटांची पाहणी करण्यात आली.
यावेळी हुतात्मा चौक, कल्पलता हॉटेल, छत्रपती शिवाजी महाराज चौक, गांधी चौक, भाजी मंडई रोड, नदीवरील परिसर तसेच विसर्जन घाटांची पाहणी करण्यात आली. या पाहणीदरम्यान घाट परिसरातील स्वच्छता, निर्माल्य व्यवस्थापन, सुरक्षा व्यवस्था, सुरक्षा रक्षक, विद्युत व्यवस्था व लाइटिंगसह नागरिकांसाठी आवश्यक सोयी-सुविधांचा आढावा घेण्यात आला.
गणेश विसर्जनासाठी मोठ्या संख्येने गणेशभक्त व नागरिक शहरातील भीमा नदी घाटांवर येत असतात. त्या पार्श्वभूमीवर विसर्जनाच्या वेळी नागरिकांना कोणतीही गैरसोय होऊ नये, तसेच संपूर्ण प्रक्रिया सुरक्षित आणि शिस्तबद्ध पद्धतीने पार पडावी, यासाठी संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना नगराध्यक्षा दुर्गादेवी इंद्रजीत जगदाळे यांनी आवश्यक सूचना व निर्देश दिले.
गणरायाचा उत्सव हा दौंडकरांच्या श्रद्धेचा आणि आनंदाचा उत्सव आहे. गणेशभक्तांना स्वच्छ, सुरक्षित आणि आवश्यक सुविधा उपलब्ध करून देणे ही दौंड नगरपरिषदेची जबाबदारी असून, त्यासाठी प्रशासनाने सज्ज राहावे, असे यावेळी नगराध्यक्षा दुर्गादेवी इंद्रजीत जगदाळे यांनी सांगितले.
यावेळी मुख्याधिकारी अवधूत तावडे , पोलीस अधिकारी विनायक सपाटे , निखिल जाधव,उपनगराध्यक्षा छाया थोरात, नगरसेवक मुकेश जगताप, नगरसेवक विकास लोंढे, दौंड नगरपालिकेचे अधिकारी व कर्मचारी तसेच स्थानिक नागरिक उपस्थित होते.

✍🏻मुख्य संपादक – संदिप बारटक्के






















