वृत्तवेध मarathi / संदिप बारटक्के
पुणे जिल्हा नियोजन समितीच्या महत्त्वपूर्ण बैठकीत दौंड मतदारसंघासह ग्रामीण पुण्याच्या विविध प्रश्नांवर आमदार राहुल कुल यांनी आक्रमक भूमिका घेत प्रशासनासमोर मागण्यांचा पाऊस पाडला. राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली दूरदृश्य प्रणालीद्वारे पार पडलेल्या या बैठकीत जिल्ह्याच्या अंतिम विकास आराखड्यास मंजुरी देण्यात आली. यावेळी जिल्ह्यातील मंत्री, खासदार, आमदार, जिल्हाधिकारी तसेच विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
बैठकीत बोलताना आमदार राहुल कुल यांनी सर्वप्रथम पुणे-सोलापूर आणि पुणे-नगर महामार्गावरील वाढत्या वाहतूक कोंडीचा मुद्दा अत्यंत गंभीरतेने उपस्थित केला. या दोन्ही महामार्गांवर मंजूर झालेल्या उन्नत मार्गाचे काम सुरू होण्यापूर्वी प्रशासनाने रस्त्याच्या दुतर्फा वाढीव लेन तयार कराव्यात, अशी त्यांनी आग्रही मागणी केली. “उन्नत मार्गाचे काम सुरू झाल्यानंतर वाहतुकीचा मोठा खोळंबा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांना त्रास होऊ नये, यासाठी आधीच पर्यायी व्यवस्था निर्माण करणे आवश्यक आहे,” असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले.
ग्रामीण भागातील पायाभूत सुविधांकडे लक्ष वेधताना आमदार कुल यांनी ग्रामपंचायत इमारती, स्मशानभूमी, गावांतर्गत रस्ते आणि सामाजिक सभागृहांची अनेक कामे प्रलंबित असल्याचे निदर्शनास आणले. ही कामे कोणतीही दिरंगाई न करता तातडीने मार्गी लावावीत, अशा सूचना त्यांनी प्रशासनाला दिल्या. ग्रामीण भागातील नागरिकांना मूलभूत सुविधा वेळेत मिळाल्या पाहिजेत, यावर त्यांनी विशेष भर दिला.
दिव्यांग नागरिकांसाठीचे अपंग साहित्य वाटप आणि खेळाडूंसाठीच्या क्रीडा साहित्य खरेदी प्रक्रियेत पारदर्शकता राखण्यासाठी ई-निविदा प्रणाली सक्तीने राबवावी, अशी मागणीही त्यांनी केली. “दर्जेदार साहित्य योग्य वेळेत उपलब्ध व्हावे आणि प्रक्रियेत कोणताही गैरप्रकार होऊ नये, यासाठी ई-टेंडर प्रणाली आवश्यक आहे,” असे त्यांनी नमूद केले. यासोबतच मंजूर झालेली विकासकामे निर्धारित वेळेत आणि गुणवत्तापूर्ण पद्धतीने पूर्ण झाली पाहिजेत, यामध्ये कोणतीही तडजोड सहन केली जाणार नाही, असा इशाराही त्यांनी प्रशासनाला दिला.
पुणे जिल्ह्याच्या ऐतिहासिक वारसाचा उल्लेख करत आमदार राहुल कुल यांनी जिल्ह्यासाठी अद्ययावत पर्यटन आराखडा तयार करण्याची मागणी केली. किल्ल्यांचे संवर्धन आणि पर्यटन विकासासाठी ‘किल्ले संवर्धन विशेष मोहीम’ राबवावी, अशी सूचना त्यांनी केली. यामुळे पर्यटनाला चालना मिळून स्थानिक रोजगारनिर्मितीलाही हातभार लागेल, असे त्यांनी सांगितले.
शेतकरी आणि ग्रामीण भागातील पाणीपुरवठा योजनांसाठी आवश्यक असलेले इलेक्ट्रिक पंप मंजूर करण्याची मागणी करत त्यांनी कृषी आणि पाणी समस्यांकडेही प्रशासनाचे लक्ष वेधले. तसेच प्रस्तावित रिंग रोड, गडकिल्ले आणि अष्टविनायक महामार्गाच्या दुतर्फा मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण मोहीम राबवून पर्यावरण संवर्धनाला प्राधान्य द्यावे, असेही त्यांनी सुचवले.
आमदार राहुल कुल यांनी मांडलेल्या विविध मुद्द्यांवर पालकमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी सकारात्मक भूमिका घेत आवश्यक त्या निर्णयांची अंमलबजावणी करण्याचे आश्वासन दिल्याने ग्रामीण भागातील विकासकामांना गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

✍🏻मुख्य संपादक – संदिप बारटक्के


























