वृत्तवेध मarathi / संदिप बारटक्के
दौंड शहराच्या विकासासाठी शासनाकडून मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध होत असतानाच, दौंड नगरपालिकेच्या नियोजनशून्य आणि संशयास्पद कारभारामुळे नवीन वाद निर्माण झाला आहे. दौंड शहरात उद्यानांसाठी विकास आराखड्यात चार जागा आरक्षित असूनही, मागील दोन दशकांत एकही उद्यान विकसित करण्यात प्रशासन सपशेल अपयशी ठरले आहे. अशा परिस्थितीत, आता बिगर-आरक्षित जागेवर ‘नमो गार्डन” उभारण्याचा प्रस्ताव पुढे आल्याने नागरिक आणि लोकप्रतिनिधींकडून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
∆ आरक्षित जागांचा प्रश्न कायमच प्रलंबित
दौंड शहराच्या विकास आराखड्यानुसार उद्यानांसाठी चार स्वतंत्र जागा राखीव आहेत. मात्र, या जागांचे संपादन करण्याची प्रक्रिया नगरपालिकेने अद्याप पूर्ण केलेली नाही. परिणामी, नागरिकांना हक्काची उद्याने मिळालेली नाहीत.
नगरपालिकेच्या बांधकाम विभागाच्या नोंदींनुसार, शासनाकडून ‘वैशिष्ट्यपूर्ण योजना’ अंतर्गत १ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. या निधीतून उत्कृष्ट उद्यान उभारण्याचा उद्देश असला, तरी प्रत्यक्षात एकही आरक्षित जागा ताब्यात नसल्याने हा निधी वापरण्याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
∆ बिगर-आरक्षित जागेवर ‘नमो गार्डन’ चा प्रस्ताव
दौंड नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांनी स्थानिक वृत्तपत्रातून जाहीर केले की, HDFC बँकेसमोरील जागेवर “नमो गार्डन” उभारण्यात येणार आहे. मात्र, अधिकृत DP Plan तपासल्यावर या जागेवर उद्यानासाठी कोणतेही आरक्षण नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
नियमांनुसार, आरक्षण बदलण्यासाठी दीर्घ प्रशासकीय प्रक्रिया आवश्यक असते. त्यासाठी वेळ लागतो. दुसरीकडे, शासनाकडून मंजूर निधी १५ जूनपूर्वी खर्च करणे बंधनकारक आहे.
त्यामुळे, आरक्षण बदलणे अशक्य असताना, बिगर-आरक्षित जागेवर निधी खर्च करण्याचा प्रयत्न हा नियमबाह्य ठरू शकतो, अशी चर्चा सुरू झाली आहे.
∆ नगरसेविका स्वाती निलेश सावंत आक्रमक
या प्रकरणावर नगरसेविका स्वाती निलेश सावंत यांनी थेट प्रशासनाला धारेवर धरले आहे. त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की “आरक्षित जागा विकसित न करता, अन्य ठिकाणी निधी खर्च करणे म्हणजे जनतेच्या पैशाचा अपव्यय आहे. प्रशासनाने पारदर्शकता ठेवून योग्य निर्णय घ्यावा.”
त्यांनी विकास आराखड्यातील विसंगती सार्वजनिक करून, या विषयावर सखोल चौकशीची मागणीही केली आहे.
∆ विकासात प्रादेशिक असंतुलनाचा आरोप
दौंड शहरातील उद्यानांच्या नियोजनात असमतोल असल्याचा आरोपही होत आहे. सध्याची आणि प्रस्तावित बहुतांश उद्याने दौंड-पाटस रस्त्यालगत केंद्रित आहेत.
उदाहरणार्थ – लोकशाहीर अण्णाभाऊ साठे उद्यान , क्रीडा संकुल
याउलट, जुन्या गावठाण भागात मोठ्या प्रमाणावर लोकसंख्या राहत असूनही, त्या ठिकाणी मुलांसाठी खेळण्याची जागा किंवा सार्वजनिक उद्यान उपलब्ध नाही.
यामुळे, जुन्या भागातील नागरिकांवर अन्याय होत असल्याची भावना तीव्र झाली आहे.
नगरसेविका स्वाती निलेश सावंत यांनी प्रशासनाला इशारा दिला आहे की आरक्षित जागांचे तातडीने संपादन करावे, निधीचा वापर नियमानुसारच करावा. जुन्या गावठाणात उद्यान विकसित करावे
अन्यथा, मोठ्या प्रमाणावर जनआंदोलन उभारले जाईल.

✍🏻मुख्य संपादक – संदिप बारटक्के


























