वृत्तवेध मarathi / संदिप बारटक्के
दौंड : पुणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाची संधी यंदा दौंड तालुक्यालाच मिळावी, अशी मागणी दौंड तालुक्यातून जोर धरू लागली आहे. तालुक्यातील विविध राजकीय व सामाजिक स्तरातून यासाठी आवाज उठू लागला असून, शेतकरी संघटनेचे नेते राजाभाऊ कदम यांनीही ही मागणी लावून धरली आहे.
यावेळी शेतकरी संघटनेचे नेते राजाभाऊ कदम यांनी मांडलेली मुख्य कारणे पुढीलप्रमाणे –
अजित पवार यांच्या विचारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा उमेदवार दौंड विधानसभा मतदारसंघात सलग चार टर्म अल्प फरकाने पराभूत झाला. तरीदेखील अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत दौंड तालुक्याने पक्ष संघटना भक्कम ठेवली आहे. या निष्ठेला न्याय मिळणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त होत आहे.
पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत इतर तालुक्यांना दोन ते तीन प्रतिनिधी मिळाले असताना दौंड तालुक्याला अनेक वर्षांपासून केवळ एकच प्रतिनिधी आहे. याशिवाय वीरधवल बाबांनी स्वर्गीय अजितदादांच्या शब्दाला मान देत जिल्हा बँक निवडणुकीत उमेदवारी अर्ज माघारी घेतल्याची आठवणही यावेळी करून देण्यात आली.
वीरधवल जगदाळे पाटील यांना दोन टर्मचा अनुभव असून जिल्हा परिषदेतील प्रशासन हाताळण्याचा परिपूर्ण अनुभव आहे. तालुक्याच्या विकासासाठी सक्षम नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते.
ज्या न्यायाने तिसऱ्या टर्मचा आमदार राज्याच्या मंत्रिपदाच्या चर्चेत येतो, त्याच न्यायाने जिल्हा परिषदेत तिसऱ्या टर्मला निवडून आलेले वीरधवल बाबांना अध्यक्षपदाची संधी मिळावी, अशी मागणी पुढे येत आहे.
यासंदर्भात राज्याच्या नूतन उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी सकारात्मक भूमिका घ्यावी आणि दौंड तालुक्याला न्याय्य व मागणीला मान्यता द्यावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.
दौंड तालुक्यातील कार्यकर्त्यांमध्येही या मागणीमुळे उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, आगामी राजकीय घडामोडींमध्ये या प्रश्नाला महत्त्व प्राप्त होण्याची शक्यता आहे.

✍🏻मुख्य संपादक – संदिप बारटक्के


























