वृत्तवेध मarathi / संदिप बारटक्के
दौंडच्या वाढत्या नागरीकरणाच्या पार्श्वभूमीवर पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी महत्त्वाची मागणी पुढे आली आहे. प्रभाग क्रमांक ४ चे नगरसेवक रोहित शकुंतला राजेश पाटील यांनी दौंड नगर परिषदेमध्ये स्वतंत्र ‘वृक्ष प्राधिकरण समिती’ स्थापन करण्याची मागणी सर्वसाधारण सभेत निवेदनाद्वारे केली आहे. हे निवेदन त्यांनी नगराध्यक्षा दुर्गादेवी जगदाळे-पाटील आणि मुख्याधिकारी अवधूत तावडे यांच्याकडे सादर केले.
दौंड शहरात मोठ्या प्रमाणावर बांधकामे व विकासकामे सुरू असताना पर्यावरण संवर्धनाची जबाबदारी अधिक महत्त्वाची ठरत आहे. याच अनुषंगाने रोहित पाटील यांनी महाराष्ट्र (नागरी क्षेत्र) झाडांचे संरक्षण आणि जतन अधिनियम, १९७५’ तथा महारष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५ च्या कलम ३१६ नुसार, प्रत्येक नगर परिषदेने आपल्या कार्यक्षेत्रात वृक्ष प्राधिकरण समिती स्थापन करणे कायद्याने बंधनकारक आहे. याच कायद्याचा आधार घेत नगरसेवक रोहित पाटील यांनी ही मागणी लावून धरली आहे.
या विषयावर बोलताना रोहित पाटील म्हणाले की, “दौंडच्या उज्वल भविष्यासाठी आणि पर्यावरणाच्या रक्षणासाठी वृक्ष प्राधिकरण समिती ही काळाची गरज आहे. आजच्या सर्वसाधारण सभेत ऐनवेळच्या विषयामध्ये हा प्रस्ताव घेऊन समिती स्थापनेचा ठराव मंजूर करावा,” अशी विनंती त्यांनी नगराध्यक्षांकडे केली.
नियमांनुसार या समितीचे अध्यक्ष नगराध्यक्ष असतात, तर मुख्याधिकारी, वृक्ष अधिकारी आणि नियुक्त सदस्यांचा त्यामध्ये समावेश असतो. समिती कार्यान्वित झाल्यास शहरातील झाडांची नोंद, परवानगी प्रक्रिया, छाटणी व वृक्षारोपण यांसारख्या बाबींना कायदेशीर बळ मिळणार असून पर्यावरण संवर्धन अधिक प्रभावीपणे होऊ शकते.
आमदार राहुल कुल, माजी नगराध्यक्ष प्रेमसुख कटारिया, राजेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आणि गटनेते योगेश कटारिया यांच्या नेतृत्वाखाली दौंड शहराच्या उज्वल भविष्यासाठी पुढेही योग्य पावले उचलली जातील, असा विश्वासही रोहित पाटील यांनी व्यक्त केला.

✍🏻मुख्य संपादक – संदिप बारटक्के


























