वृत्तवेध मarathi | संदिप बारटक्के
दौंड नगरपालिका हद्दीतील दौंड-शिरापूर रोडवरील छत्रपती संभाजी महाराज यांचा स्तंभ सध्या अत्यंत जीर्ण अवस्थेत असून ऊन, वारा व पावसामुळे त्याची मोठ्या प्रमाणावर झीज झाली आहे. धर्मवीरांच्या स्मृतीचे प्रतीक असलेला हा स्तंभ आज दुर्लक्षित अवस्थेत उभा आहे, ही बाब तमाम शिवभक्तांच्या भावना दुखावणारी आहे. इतक्या महत्त्वाच्या श्रद्धास्थानाकडे प्रशासनाचे होत असलेले दुर्लक्ष खेदजनक आहे.
‘धर्मवीर बलिदान मास’ हा छत्रपती संभाजी महाराज यांच्या बलिदानाच्या स्मरणार्थ फाल्गुन शुद्ध प्रतिपदा ते फाल्गुन अमावस्या या कालावधीत मोठ्या श्रद्धेने पाळला जातो. या काळात दौंड शहरासह बाहेरील भागांतून शिवभक्त दर्शनासाठी येत असतात. अशा वेळी स्तंभाची झालेली दुरवस्था ही प्रशासनाच्या उदासीनतेचे द्योतक आहे.
शिवभक्तांच्या भावना लक्षात घेऊन आणि भविष्यात कोणतीही अप्रिय घटना घडू नये यासाठी तात्काळ दुरुस्ती, रंगरंगोटी व सुशोभीकरणाची कामे हाती घ्यावीत, अन्यथा शिवप्रेमी नागरिक तीव्र आंदोलन छेडण्याच्या भूमिकेत जातील, असा इशारा देत शिवकन्या नगरसेविका स्वाती निलेश सावंत यांनी मुख्याधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे.

✍🏻मुख्य संपादक – संदिप बारटक्के


























