वृत्तवेध मarathi / संदिप बारटक्के
दौंड : सिद्धटेक रोडवरील श्री दत्तपीठ दत्तमंदिर येथे श्री स्वामी समर्थ महाराज यांचा प्रकटदिन सोहळा उत्साहात व अत्यंत भक्तिमय वातावरणात पार पडला. यावेळी नर्मदा परिक्रमा पूर्ण केलेल्या परिक्रमावासींचा दत्तपीठ मंदिराच्या वतीने विशेष सन्मान करण्यात आला.
या प्रसंगी नर्मदा परिक्रमा केलेले श्री प्रकाश रामभाऊ खळदकर, श्री निवृत्ती यशवंत होलम व श्री बबन राजाराम खोडवे यांचा सत्कार श्री दत्तपीठ दत्तमंदिरचे प्रमुख विश्वस्त बुवा सावंत, विलास बर्वे, सचिन साने, राकेश भोसले व कुंडलिक चुंबळकर यांच्या हस्ते करण्यात आला.
सन्मानानंतर परिक्रमावासींनी नर्मदा परिक्रमेतील आपले अनुभव कथन केले. त्यांनी सांगितले की, नर्मदा परिक्रमा ही अत्यंत खडतर असली तरी ती अध्यात्मिक, मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या जीवन बदलणारी यात्रा आहे. ओंकारेश्वर किंवा राजपिपलावरून सुरू होणाऱ्या या पायी यात्रेत नर्मदा मातेचे ममत्व, अनोळखी लोकांकडून मिळणारे प्रेम, निस्वार्थ सेवा, दाट जंगले आणि आश्रमांतील निवारा हे अनुभव आयुष्यभर लक्षात राहणारे आहेत.
कार्यक्रमादरम्यान १२५ स्वामी भक्तांना श्री स्वामी समर्थ ध्यान-एकाग्रता नामजप वहीचे वाटप करण्यात आले. त्यानंतर स्वामी समर्थ महाराजांची महाआरती नगरसेविका सौ. वैशाली विशाल माशाळकर, सौ. मनिषा संपत पाटील, सौ. क्षितिजा अमित हेंद्रे व सौ. मनिषा प्रशांत पवार यांच्या शुभहस्ते करण्यात आली.
यावेळी नगरसेविका सौ स्वाती निलेश सावंत यांच्या हस्ते आरती च्या मानकऱ्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाची सांगता महाप्रसादाने करण्यात आली. यावेळी दत्त भक्त व स्वामी समर्थ भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते निलेश सावंत, रतन बोधे, निखिल सावंत, नरेंद्र सावंत, राहुल हजारे, एकनाथ कोरडे व नितीन राऊत यांनी विशेष परिश्रम घेतले.

✍🏻मुख्य संपादक – संदिप बारटक्के


























