वृत्तवेध मarathi | संदिप बारटक्के
दौंड – छंद, साहित्य आणि समाजसेवा यांचा सुंदर संगम घडवत कवयित्री सुनेत्रा देशपांडे तसेच त्यांच्या ब्रिटन निवासी सून कृपा वगळ देशपांडे यांनी एक प्रेरणादायी सामाजिक उपक्रम राबविला. दौंड येथील श्रीमती विठाबाई चव्हाण कन्या विद्यालयातील इयत्ता ५ वी ते ९ वी मधील तब्बल ११३ गरजू विद्यार्थिनींना मोफत बुटांचे वाटप करण्यात आले.
हा उपक्रम ‘मधुसिंधू काव्यप्रकार काव्यमंच’च्या माध्यमातून आयोजित करण्यात आला होता. प्राचार्या माधुरी काकडे यांनी या मधुसिंधू काव्यप्रकाराची निर्मिती करून काव्यमंचाची स्थापना केली असून, साहित्य आणि समाजकार्य यांचा संगम घडविण्याचा त्यांचा प्रयत्न या उपक्रमातून स्पष्टपणे दिसून आला.
अनेक विद्यार्थिनी आर्थिक अडचणींमुळे शालेय जीवनात आवश्यक सुविधांपासून वंचित राहतात, ही बाब लक्षात घेऊन या उपक्रमाची आखणी करण्यात आली. बुटांचे वाटप संस्थेचे चेअरमन विक्रम कटारिया, संस्था सदस्य ललित सरनोत, विद्यालयाच्या प्राचार्या माधुरी काकडे, शाळा व्यवस्थापन समितीच्या उपाध्यक्षा शबाना शेख, संतोष कांबळे, किरण खामले तसेच पालक यांच्या हस्ते करण्यात आले.
या प्रसंगी विद्यार्थिनींच्या चेहऱ्यावर दिसणारा आनंद, समाधान आणि उत्साह हा उपक्रमाच्या यशाची खरी पावती ठरला. या उपक्रमामुळे विद्यार्थिनींना आवश्यक सुविधा मिळाल्याने त्यांच्या शिक्षणाबद्दलच्या उत्साहात आणि आत्मविश्वासात वाढ होणार असल्याचा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला.
कवयित्री सुनेत्रा देशपांडे या मधुसिंधू काव्यमंचाच्या सक्रिय सदस्या असून साहित्य क्षेत्रासोबतच त्या सामाजिक कार्यातही सातत्याने योगदान देत आहेत. तसेच त्यांच्या सून कृपा वगळ देशपांडे या ब्रिटनमध्ये वास्तव्यास असूनही मातृभूमीशी असलेली नाळ जपत अशा सामाजिक उपक्रमांत सहभागी होत असल्याने त्यांचे विशेष कौतुक करण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उर्मिला उपाध्ये यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विद्यालयातील शिक्षकवृंदांनीही मोलाचे सहकार्य केले. या उपक्रमातून समाजातील इतरांनीही गरजूंसाठी पुढाकार घ्यावा, असा प्रेरणादायी संदेश देण्यात आला.

✍🏻मुख्य संपादक – संदिप बारटक्के


























