वृत्तवेध मarathi / संदिप बारटक्के
दौंड : हिंदवी स्वराज्याचे दुसरे छत्रपती, धर्मवीर, स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांचे दौंड शहरात भव्यदिव्य स्मारक व पूर्णाकृती पुतळा उभारण्यात यावा, अशी भावना तमाम शिवशंभूप्रेमींनी व्यक्त केली आहे.
दौंड शहराच्या मंजूरस्तर विकास आराखड्यातील आरक्षण क्रमांक ५९ मध्ये किरकोळ फेरबदल प्रस्ताव मंजूर करून त्या ठिकाणी स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांचे भव्य स्मारक उभारण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे.
छत्रपती संभाजी महाराजांचे शौर्य, विद्वत्ता, साहित्यिक व्यक्तिमत्त्व आणि राष्ट्रनिष्ठ विचार समाजासमोर व्यापकपणे यावेत, यासाठी हे स्मारक प्रेरणास्थान ठरेल, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. संभाजी महाराजांना केवळ युद्धापुरते मर्यादित न ठेवता त्यांची बौद्धिक व साहित्यिक बाजू समाजासमोर आणणे काळाची गरज असल्याचे मतही शिवशंभूप्रेमींनी मांडले.
इतिहासातील अनेक महापुरुषांच्या विचारांचा व कार्याचा परिचय समाजाला करून देण्याचे महत्त्वपूर्ण कार्य स्मारके करत असतात. त्यामुळे छत्रपती संभाजी महाराज यांचे भव्य स्मारक व पूर्णाकृती पुतळा उभारल्यास दौंड शहराच्या वैभवात मोठी भर पडेल. तसेच आपल्या दैदिप्यमान इतिहासाला न्याय मिळून तरुण पिढीला प्रेरणा मिळेल व समाजामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
या संदर्भातील निवेदन अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने आमदार राहुल कुल, नगराध्यक्षा दुर्गादेवी जगदाळे पाटील, प्रांत अधिकारी रेवणनाथ लबडे, मुख्याधिकारी अवधूत तावडे, ज्येष्ठ नेते प्रेमसुख कटारिया, उपनगराध्यक्षा छाया थोरात, गटनेते योगेश कटारिया, जिवराज पवार तसेच संबंधित मान्यवरांना देण्यात आले आहे.

✍🏻मुख्य संपादक – संदिप बारटक्के


























